Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटी गावाजवळ अपघातग्रस्त आणि अपघातात 25 जणांचा जीव घेणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसवर (Vidarbha Travels) परिवहन विभागाची अर्थपूर्ण मेहेर नजर होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे अपघात झालेल्या त्याच बसवर यापूर्वी अनेक वेळेला वाहतूक नियमांचा (Traffic Rules) उल्लंघन केल्याप्रकरणी चालान (दंड) झालेले आहेत. मात्र संबंधित बस कंपनीने कधीही ते चालान (दंड) भरले नाही. अपघात झाल्यानंतर मात्र अवघ्या काही तासातच सर्व चालान (दंड) ऑनलाईन भरण्यात आले. त्यामुळे परिवहन विभागाचे अधिकारी या बसच्या वारंवार वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी का दुर्लक्ष करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अपघात होऊन 25 जणांचे जीव घेणाऱ्या बस विरोधातील गेल्या दोन वर्षात लागलेले दंड
- 5 फेब्रुवारी 2021 रोजी संबंधित बसला पीयूसी नसल्याच्या कारणामुळे बाराशे रुपयांचा चालान आकारण्यात आला होता.
- 24 ऑगस्ट 2022 रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या याच बसला फिटनेस प्रमाणपत्र न दाखवणे आणि अयोग्य लाईटचा वापर करणे यासाठी 4 हजार 500 रुपयांचे दंड लागले होते.
- 11 ऑक्टोबर 2022 रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या याच बसला फिटनेस प्रमाणपत्राचा कालावधी संपल्याप्रकरणी तब्बल 23 हजार 500 रुपये, स्पीड गव्हर्नर नीट काम करत नाही यासाठी 2 हजार रुपये, अग्निशमन सुरक्षा यंत्रणा कार्यरत नाही यासाठी 500 रुपये, आपात्कालीन दरवाजा नीट काम करत नाही म्हणून 2 हजार रुपये असे चालान आकारण्यात आले होते.
- जानेवारी 2023 मध्येही नो पार्किंगमध्ये बस उभी केल्याप्रकरणी 500 रुपयांचा दंड लागला होता.
- 12 जून 2023 रोजी ही या बसला विविध नियमांच्या उल्लंघन प्रकरणी 11 हजार 200 रुपयांचे दंड लावण्यात आला होता. तेव्हा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले, वाहन चालकाने योग्य ड्रेस घातले नाही, बसच्या विंडोचे काही काच तुटलेल्या आहेत तसेच बस ठरलेल्या ठिकाणी न थांबवता प्रवासादरम्यान मध्येच थांबवणे अशा कारणांसाठी हा दंड आकारला होता.
- विशेष म्हणजे हे सर्व चालान अपघात झाल्यानंतर एक जुलै 2023 रोजी दुपारी 1:15 पासून 1:23 दरम्यान ऑनलाईन भरण्यात आले आहेत.
समृद्धी महामार्गावरील अपघातात 25 जणांचा मृत्यू
नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा शनिवारी समृद्धी महामार्गावर (Samrudhi Highway) भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले. बस सर्वात आधी लोखंडी पोलला धडकली त्यानंतर काही अंतरावर जाऊन पलटी झाली आणि तिने अचानक पेट घेतला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा