Nagpur News : मित्रांसाठी हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) चरसची खरेदी करुन नागपूरला (Nagpur) आलेल्या सुशिक्षित तरुणीला गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (NDPS) सेलने रेल्वे स्थानकासमोरुन अटक केली. तिच्या दोन मित्रांनाही पोलिसांनी या प्रकरणात आरोपी बनवले आहे. राजेश्वरी शिवनानी (वय 23 वर्षे), ऋषभ सेवलानी (वय 25 वर्षे) आणि रोहित जेठानी (वय 24 वर्षे) तिन्ही रा. जरीपटका अशी आरोपींची नावे आहेत. राजेश्वरी ही इंटेरिअर डिझायनर आहे.


आंध्र प्रदेश एक्स्प्रेसने (andhra pradesh express) तीन महिला नागपूरला येत असून त्यांच्यातील एकीकडे चरस असल्याची माहिती एनडीपीएस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पंचांसह रेल्वे स्थानक (Nagpur Railway Station) परिसरात सापळा रचला. मुख्य द्वाराजवळ पोलिसांनी संशयाच्या आधारावर तिन्ही महिलांना थांबवून त्यांची झडती घेतली. राजेश्वरीच्या जॅकेटच्या खिशात पोलिसांना प्लॅस्टिकच्या पाकिटामध्ये 19 ग्रॅम चरस मिळाले. चरस जप्त करुन राजेश्वरीला अटक करण्यात आली. इतर दोघींजवळ काहीही संशयास्पद नसल्याने त्यांना सोडण्यात आले. 


हिमाचल प्रदेशात गेली होती फिरायला


माल कुठून आणि कोणासाठी खरेदी केला याबाबत विचारपूस केली असता राजेश्वरीने सांगितले की, "ती मैत्रिणींसह हिमाचल प्रदेशात फिरायला गेली होती. या दरम्यान तिचे मित्र ऋषभ आणि रोहित यांनी तिच्याशी संपर्क केला. त्यांनी तिला कसौलच्या स्टोन गार्डन (Stone Garden Cafe) कॅफेत जाऊन एका व्यक्तीकडून चरस खरेदी करण्यास सांगितले होते. चरस खरेदी करण्यासाठी त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून खात्यात पैसेही पाठवले होते." सुशिक्षित असतानाही राजेश्वरी मित्रांना नाही म्हणू शकली नाही. 


पोलिसांनी फोन केला जप्त


पुढील कारवाईसाठी एनडीपीएस सेलने तिला सीताबर्डी पोलिसांच्या (Sitabuldi Police Station) स्वाधीन केले आहे. ती सापडल्याची माहिती मिळताच ऋषभ आणि रोहित फरार झाले आहेत. पोलीस दोघांच्याही घरी गेले होते, मात्र ते गायब होते. पोलिसांनी राजेश्वरीचा फोनही जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, सहायक पोलीस निरीक्षक अरुण बकाल, पोलीस हवालदार प्रमोद धोटे, समाधान गीते, सुनील इंगळे, परमेश्वर कडू, मनोज नेवारे, विवेक अढाउ, रोहित काळे आणि अनूप यादव यांनी केली.


तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात


सध्या नागपुरात पार्टी कल्चरला उत आले असून शहरात जवळपास दर आठवड्याला नवनवीन क्लब/लाऊंज सुरु होत आहे. याठिकाणी आठवडाभर विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी ड्रग्स पेडलर्सकडून तरुणाईला हेरुन ड्रग्सची चटक लावण्यात येते. ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत शहराबाहेरील क्लबमध्येही पहाटेपर्यंत पार्ट्या चालतात. यामध्ये फक्त कूल वाटण्यासाठी तरुणाई विविध अंमलीपदार्थ टेस्ट करत असते. जरीपटकामध्येही सध्या ड्रग्स पेडलर सक्रिय असल्याची माहिती आहे. मात्र मोठं अर्थकारण असल्याने या पेडलरकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात येत असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार धंतोलीमध्येही चोवीस तास गांजा सहज उपलब्ध होतो. मात्र याकडेही पोलिसांकडून डोळेझाक करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.


ही बातमी देखील वाचा


Gram Panchayat Election : नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींची चुरस, सव्वादोनशेहून अधिक ग्रामपंचायतींमधील 761 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात