नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार नागपूर महापालिकेतील काही भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्लॅन करण्यासंदर्भात दोन लोकांमधील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार त्यामध्ये संभाषण करणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये एक व्यक्ती साहिल सय्यद आहे. विशेष बाब म्हणजे नागपूर पोलिसांना साहिल सय्यद आधीच एलेक्सिस रुग्णालयात डॉक्टर्सला धमकावण्याच्या प्रकरणात वॉन्टेड आहे. 4 जुलै रोजी एलेक्सिस रुग्णालयात महापालिकेच्या एका वादग्रस्त डॉक्टर्सच्या उपस्थितीत साहिल सय्यद याने रुग्णालयात फक्त गोंधळच घातला नव्हता. तर एलेक्सिस रुग्णालयातील डॉक्टर्सला जीवे मारण्याची आणि रुग्णालयाची भिंत बुलडोझर आणून पाडण्याची धमकी दिली होती. एलेक्सिस रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये साहिल सय्यद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून साहिल सय्यद फरार झाला होता.
त्यानंतर भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा नियोजन करणाऱ्या दोघांची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. भाजप नेत्यांनी त्यासंदर्भात नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनसह इतर अनेक पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार नोंदविली होती. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर भाजपच्या नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये फसवा, असा उल्लेख असलेल्या ऑडिओ क्लिपचे प्रकरण गंभीर असून त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणी करत गृहमंत्र्यांना चौकशीसाठी पत्र ही लिहिले होते. गृह मंत्री अनिल देशमुखांनी ही या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिले होते. आता त्याच प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठा खुलासा करत ऑडिओ क्लिप मधील एक आवाज वादग्रस्त साहिल सय्यद याचा असल्याचा दावा केला आहे. तसेच या क्लिप मध्ये आवाज असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतले असून लवकरच साहिल सय्यदला अटक करू असा दावाही पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, एलेक्सिस रुग्णालयातील धमकी प्रकरण आणि आता वादग्रस्त ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात फरार असलेल्या साहिल सय्यद विरोधात आता नागपूरच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत मानकापूर आणि पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये साहिल सय्यद विरोधात जीवे मारण्याची धमकी देणे, खोट्या कागदपत्रांच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती बळकावणे, फसवणूक करणे असे गुन्हे दाखल झाले आहे.
नागपूर पोलिसांनी साहिल सय्यदला शोधण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली असून त्याच्या घरातील सर्चमध्ये अनेक वादग्रस्त दस्तावेज आणि संपत्तीचे कागदपत्रे सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे पोलिसांना त्याच्या घरातून अनेक बनावट पॅन कार्ड आणि इतर शासकीय दस्तावेज ही सापडले आहेत. त्यामुळे त्याने बनावट नावानी अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता बळावली आहे. साहिल सय्यदला शोधण्यासाठी नागपूर पोलीस ठिकठिकाणी छापे घालत आहेत.
विशेष म्हणजे साहिल सय्यद एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलचा नागपूर शहर अध्यक्ष असून त्याला विविध पक्षीय नेत्यांसोबत जवळीक साधून त्यांच्यासोबत फोटो काढण्याची हौस आहे. सध्या त्याचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे अनेक फोटो समोर आले आहे. त्यामुळे नेत्यांसोबत जवळीक साधने, त्यांच्यासोबत फोटो काढणे आणि नंतर त्याच्या आधारे सामान्य लोकांवर प्रभाव टाकून त्यांना फसविणे, त्यांना ब्लॅकमेल करणे अशी साहिल सय्यदची कार्यपद्धती असल्याचे पोलिसानं वाटतंय. फरार असलेल्या साहिल सय्यद संदर्भात कोणतीही माहिती किंवा त्याने फसवणूक केल्याची तक्रार असल्यास नागरिकांनी नागपूर पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन ही गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे.