नागपूर : सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटतेय, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधीलच सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळेच सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही असं सांगत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टीका केली. कोकणात ठाकरेंची शिवसेनाच चालेल, आदित्य ठाकरेंसाठी (Aaditya Thackeray) विरोधी पक्षनेतेपदाचा एका क्षणात त्याग करेन असंही भास्कर जाधव म्हणाले. एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव या नावाचे पत्र देण्यात आल्याचं आदित्य ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं. तरीही सरकारने आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवली तर त्यांच्यासाठी एका क्षणात मी त्याग करेन असं भास्कर जाधव म्हणाले.
Bhaskar Jadhav On Opposition Leader : सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती
सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती असल्याचं सांगत भास्कर जाधव म्हणाले की, "दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद दिलं जातं. जेव्हा पक्षाच्या गटनेतेपदी माझी निवड झाली तेव्हा हे शक्य आहे असं मला वाटलं. मी सचिवांना पत्र लिहलं. विरोधी पक्ष नेतेपद निवडीसंदर्भात कायद्यात तरतूद काय याची माहिती लिखित द्यावी अशी मागणी केली. त्यावेळी अशी 10 टक्के सदस्यसंख्येची अट नाही, अशी माहिती सचिवालयाने दिली."
या सरकारमधील भ्रष्टाचाराची जी प्रकरणं बाहेर येत आहेत ते हिमनगाचे एक टोक आहे. हे लोक एकमेकांचे पाय ओढत आहेत. विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाली तर सरकारमधील लोक विरोधी नेत्याला माहिती देऊन एकमेकांना अडचणीत आणतील अशी त्यांना भीती आहे असं भास्कर जाधव म्हणाले.
Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं तर शक्य
आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांची भेट घेतली. उद्धव साहेब विधानसभा अध्यक्षांना भेटले, त्यांनीही मागणी केली होती. दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. मंत्र्यांना पीएस कोण द्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर विरोधी पक्षनेतेपद देणं शक्य आहे. मात्र ते एकमेकांवर टोलवत आहेत असं भास्कर जाधव म्हणाले.
Bhaskar Jadhav Interview : सत्ताधाऱ्यांमध्ये कुरबुरी सुरू
भास्कर जाधव म्हणाले की, "एक वर्ष सत्ता स्थापनेला पूर्ण झाली. वेगवेगळ्या अभ्यासकांनी जी मतं दिली त्यात कुणी त्यांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क दिले नाहीत. मी या सरकारला साडे तीन मार्क देतो. हे सरकार अनपेक्षितपणे तयार झालेलं सरकार आहे. 45 खासदार आम्ही निवडणून आणू अशा प्रकारच्या वल्गना करत होते, त्यांना 16 च्या पुढेही जाता आलं नाही. विधानसभेत हेच होणार असं वाटत होतं. शिंदेंच्या मार्फत वारेमाप आश्वासन दिली गेली. त्यांना मुख्यमंत्री करू असं खासगीत आश्वासन दिलं अशी माझी माहिती आहे. पण तसं झालं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसांपासून त्यांच्यात कुरबुरी सुरू आहेत."
सत्ता आल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर क्लेम करायला तोंड राहिलेलं नाही. जर शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले नसते तर भाजप सत्तेत आलं नसतं. सत्ता आल्यानंतर शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते. पण मुख्यमंत्रीपद भाजपने काढून घेतल्यानंतर ते कुठल्या तोंडाने बोलणार? असं भास्कर जाधव म्हणाले.
Bhaskar Jadhav On Shivsena Politics : मी नाराज नाही
भास्कर जाधव नाराज असल्याच्या बातम्या नेहमीच येतात. त्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, "मी माझ्या राजकीय जीवनात कुठल्याही कारणासाठी नाराजी व्यक्त केलेली नाही. जे सत्य असेल तेच बोलतो, खोटं बोलत नाही. मी एकदा शब्द दिला की मी तो पूर्ण करण्यासाठी काहीही किंमत मोजायला तयार असतो. माझ्या 43 वर्षाच्या राजकीय प्रवासात मी कधी कुणाकडे कुठलीही गोष्ट मागितली नाही. जर चुकीचं काही असेल तर मी त्या विरोधात बोलताना कुणताही मुलाहिजा राखत नाही . उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्रिमंडळात माझा समावेश झाला नाही. तेव्हा मी भावना बोलून दाखवली होती."
Kokan Politics : कोकणात ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल
कोकणातील राजकीय परिस्थितीवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, "कोकणातील स्थितीचे वास्तव स्वीकारलं पाहिजे, त्या ठिकाणी शिवसेनेत दोन भाग झाले. भाजप सोबत होते तेव्हा त्यांनी पण शिवसेनेला पोखरलं. विरोधकांचे रोज पक्ष प्रवेश होतायत तरी ते ठाकरेंची शिवसेना संपणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागेल."