Continues below advertisement

नागपूर : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mudhe) यांच्याविरोधात भाजप आमदार कृष्णा खोपडे (BJP) लक्षवेधी मांडणार असल्याचे वृत्त झळकताच खोपडे यांना फोनवरून धमकीचे कॉल आल्याची माहिती. खोपडे यांच्यासंदर्भातील वृ्त्त एबीपी माझाने सर्वप्रथम दिले होते, ही बातमी झळकताच अधिवेशनासाठी नागपूर (Nagapur) येथे असलेल्या खोपडे यांना धमकीचा कॉल आल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. आम्ही तुकाराम मुंढे यांचे समर्थक आहोत असे सांगून दोघांनी पाहून घेण्याची धमकी देत फोनवरुन इशारा दिला आहे.

राज्यातील प्रसिद्ध आणि बदलीमुळे सातत्याने चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे. तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची "स्मार्ट सिटी प्रकल्प"चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता, असा आरोप भाजपाचा आहे. त्यामुळे, तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपा आमदार विधिमंडळ अधिवेशनात करणार आहेत.

Continues below advertisement

नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार कृष्णा खोपडे आज विधिमंडळात प्रवेश करत असताना त्यांना धमकीचे कॉल आले. खोपडे यासंदर्भात विधिमंडळ सचिवालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला रीतसर माहिती देणार आहेत. त्यानंतर, पोलिस तक्रारही दाखल केली जाईल. दरम्यान, आज सकाळीच एबीपी माझाने तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात लक्षवेधी मांडण्यात येणार असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर, ही घडामोड झाल्याचे समजते.

भाजपाचे नेमके आरोप काय? (BJP allegations against Tukaram Mundhe)

1) स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते.

2) तसेच काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती.

3) दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या दबावात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आवश्यक कारवाई होऊ शकली नव्हती. आता ते दोन्ही जुने प्रकरण नव्याने पुन्हा समोर आणून भाजप आमदार तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा

बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'