Anil Deshmukh On Vote Chori: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आतापर्यंत आरोप केला असतानाच काल (6 नोव्हेंबर) पुन्हा एकदा व्हिडिओ सादरीकरण करत हरियाणात थेट सरकार चोरीचा आरोप केला. तब्बल 25 लाख बनावट मतदार हरियाणामध्ये असून केवळ 22000 मतांनी काँग्रेसचा पराभव झाला. जो विजय काँग्रेसच्या आवाक्यात होता त्याच ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आणि मत चोरी करून भाजपने विजय मिळवल्याचा गंभीर आरोप करत राहुल गांधी यांनी काही पुरावे सुद्धा सादर केले. आता हे पुरावे ताजे असताना महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी सुद्धा त्यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघांमध्ये मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

Continues below advertisement

35000 हून अधिक मत चोरी

शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातून भाजपने लोक आणून आपल्या मतदारसंघांमध्ये मतदान केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. इतकेच नव्हे तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा काटोल मतदारसंघांमध्ये मतदान केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याकडे दोन दोन मतदान ओळखपत्रे असल्याचा दावाही त्यांनी केला. आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून आमच्या मतदारसंघातील मतदारयादीवरती काम करत होतो. जवळपास 60 लोकांची टीम यावर काम करत होती. यावेळी जवळपास 35000 हून अधिक मत चोरी झाल्याचा आरोप देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. त्यांनी सांगितले की मध्य प्रदेशात सीमेवर लांघा हे गाव आहे. त्या गावच्या सरपंचांनी सुद्धा आपल्या मतदारसंघांमध्ये मतदान केल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला. त्यांच्या विरोधात निवडून आलेले भाजप आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या दोन भावांचे काटोल मतदारसंघांमध्ये दोन दोन वेळा मतदार यादीत नाव असल्याचा दावा केला. 

सरपंच वनिता पराडकर यांचे उदाहरण दिले

देशमुख यांनी मध्य प्रदेशातील लांघा गावातील सरपंच वनिता पराडकर यांचे उदाहरण दिले. वनिता पराडकर या भाजप कार्यकर्त्या असून त्या मध्य प्रदेशातील लांघा गावच्या सरपंच आहेत. त्यांचे नाव मध्य प्रदेशातील मतदार यादीत असताना सुद्धा महाराष्ट्रातील काटोल विधानसभा क्षेत्रातही त्यांचे नाव मतदार यादीत आहे आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतदान केल्याचा दावाही देशमुख यांनी केला. देशमुख यांनी वनिता पराडकर यांचे दोन्ही ठिकाणचे मतदार ओळखपत्र दाखवले. मात्र, त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलं आहे, याचा कुठलाही पुरावा दिला नाही. काटोलचे भाजप विद्यमान आमदार चरण सिंह ठाकूर यांच्या दोन भावांचेही काटोल मतदारसंघात दोन दोन वेळेला मतदारयादीत नाव असल्याचे पुरावे देत देशमुख यांनी त्या दोघांनी दुबार मतदान केल्याचा आरोप केला.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या