Sharad Pawar Nagpur Visit : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजपासून दोन दिवसीय नागपूर (Nagpur) दौऱ्यावर येत आहेत. शरद पवार यांचा हा दौरा प्रामुख्याने मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिवनी या ठिकाणी उद्या (2 एप्रिल) होणाऱ्या आदिवासी अधिकार मेळाव्यातील उपस्थितीसाठी आहे. मात्र त्यापूर्वी आज (1 एप्रिल) सकाळी साडे दहा वाजता शरद पवार नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर ते थेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) गोपालपूर आणि म्हसाळा या ठिकाणी घेतलेल्या जमिनीची (फार्म) पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. सोबतच या दौऱ्यादरम्यान ते पक्षाच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे.


इन्स्टिट्यूटच्या शाखेसाठी निश्चित झालेल्या जागेची शरद पवार पाहणी करणार


विदर्भातही साखर उद्योगाचा विकास व्हावा, ऊस लागवडीला चालना मिळावी या दृष्टिकोनातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विदर्भात एक शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार आज विमानतळावरुन गोपालपूर आणि म्हसाळा या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या शाखेसाठी निश्चित झालेल्या जागेची पाहणी करायला जाणार आहेत. 


शरद पवार आपल्या फार्मवर येतील : आशिष देशमुख 


यावेळी शरद पवार हे शेजारीच असलेल्या आपल्या फार्मवर येतील, असा दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कट्टविरोधक असलेले आशिष देशमुख यांच्या फार्मला शरद पवार भेट देणार असल्याच्या चर्चेने राजकीय विश्लेषकांच्या भोवऱ्या उंचावलेल्या आहे. 


आज संध्याकाळी पवारांची पत्रकार परिषद, उद्या सिवनीतील मेळाव्यात हजेरी


आज सायंकाळी पाच वाजता शरद पवार एक पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. आज त्यांचा मुक्काम नागपूरला असून उद्या शरद पवार मध्य प्रदेशातील सिवनीतील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता ते रस्ते मार्गावरुन सिवनीला जाणार आहे. इथे आयोजित आदिवासी अधिकार मेळाव्याला ते हजर राहतील. त्यानंतर संध्याकाळी 5.45 वाजता ते सिवनीहून नागपूरला परत येतील आणि रात्री 8.35 वाजता मुंबईला रवाना होतील.  


शरद पवार यांचा दोन दिवसीय दौरा


शनिवार : 1 एप्रिल, 2023


सकाळी 9 वाजता - मुंबईहून खासगी विमानाने नागपूरला रवाना होणार
सकाळी 10.15 वाजता - नागपूर विमानतळावर आगमन
सकाळी 10.45 वाजता -  गोपालपूर आणि म्हसाळा इथे रवाना होणारा
सकाळी 11.20-12.15 वाजेपर्यंत वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूट फार्मची पाहणी करणार
दुपारी 12.15 वाजता - गोपालपूर आणि म्हसाळावरुन रवाना होणार
दुपारी 1.10 बजे - हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये पोहोचणार
संध्याकाळी 5.15 वाजता - पत्रकार परिषद
रात्री 8.30 वाजता - रात्रीच्या जेवणानंतर लेखक, विचारवंत यांच्यासोबत अनौपचारिक बैठक
हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्काम


रविवार : 2 एप्रिल 2023


सकाळी 9 वाजता - नागपूरहून मध्य प्रदेशसाठी रवाना होणार
सकाळी 11.30 वाजता मध्य प्रदेशातील सिवनीमध्ये आगमन
दुपारी 12-2 वाजता - मेळाव्याला संबोधित करणार
दुपारी 3 वाजता - सिवनीहून नागपूरला रवाना होणार
संध्याकाळी 6 ते 7 वाजता - नागपूरला पोहोचणार
संध्याकाळी 8.35 वाजता नागपूरहून रवाना होणार
रात्री 10 वाजता - मुंबई विमानतळावर आगमन