नागपूर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभेनंतर आता नागपूरमध्ये ओबीसी समाजाने (OBC Sabha ) येत्या 26 नोव्हेंबरला भव्य सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहे का? यावर आधीच काही ओबीसी नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. ओबीसींचा कोटा वाढवून मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्या आणि ओबीसीचे प्रवर्ग करून मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या वडेट्टीवारांच्या या भूमिकेचा ओबीसी समाजाने कडाडून विरोध केला होता. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांना युटर्न घ्यावा लागला होता. परत आता त्यांनी सभेची घोषणा करायला घाई केली असा सूर ओबीसी समाजातून पुढे येत आहे.


ओबीसी संघटनांच्या कायम पाठीशी


 विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाज (Maratha Reservation) जर शक्तीप्रदर्शन करत असेल तर ओबीसी संघटनांची कृती समिती गठीत करून सभेची तयारी करत आहे. आम्ही साडेतीनशे जातींचा समाज आहे. मराठा समजाच्या आंदोलनाला अदृश्य शक्ती पाठिंबा देत आहे. पुढील महिन्यात संविधान दिनी सभा घेण्याचा प्रयत्न आहे. मी कायम ओबीसी संघटनांच्या पाठीशी आहे. आम्ही समाजाला घेऊन चालत आहोत, आम्ही धमकीचे भाषा करत नाहीत. 


... तर आम्ही जरांगे यांच्या पेक्षा मोठं आंदोलन उभं करू : मनोज जरांगे 


ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले की, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा आमचा विरोध कायम असल्याचं सांगितलं आहे. दबावात राज्य सरकार असं करणार नाही, असं आम्हाला राज्य सरकारनं आश्वासन दिलं आहे. राज्य सरकारनं जर दबावात आपली भूमिका बदलण्याचा विचार जरी केला तर आम्ही जरांगे यांच्या पेक्षा मोठं आंदोलन उभं करू" 


ओबीसी आरक्षणाला कोणाचा धक्का लागू देणार नाही : फडणवीस


आंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील लोकांनी जरांगेंच्या सभेसाठी हजेरी लावली होती. आरक्षणसाठी मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर ओबीसी समाजाने आंदोलन पुकारले आहे. त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये ओबीसी समाजाकडून आंदोलन (OBC Protest) देखील करण्यात आले. तसेच हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, ओबीसी समाजाचं आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही. तर या आरक्षणावर कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही.