नागपूर: पाटणकर चौकातील शासकीय बालगृहातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांना शोधून काढण्यात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला अखेर यश आले. सात वर्षानंतर पोलिसांनी त्यांना मध्यप्रदेश आणि केरळ येथून ताब्यात घेतले. आता दोघेही वयात आले आहेत. सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांनी त्यांच्या अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता.
बालगृहात राहणाऱ्या मुलांना आसपासच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठविले जाते. 31 जानेवारी 2015 ला 10, 11 आणि 13 वर्ष वयोगटातील तीन मुले नागसेननगरच्या वैशाली प्राथमिक शाळेत शिकायला जात होते. दरम्यान एक दिवस ते बेपत्ता झाले. तत्कालीन अधीक्षक भारती मानकर यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. 11 वर्षीय बालक तर दुसऱ्याच दिवशी मिळाला, मात्र बिहारच्या मधुबनी येथे राहणारा मोहम्मद रज्जी अहमद आणि आमला, बैतूल येथे राहणारा संदीप मोतीलाल धुर्वे यांचा शोध लावण्यात जरीपटका पोलिसांना अपयश आले. त्यामुळे प्रकरण गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला सोपविण्यात आले.
NMC Elections : नागपुरात माजी नगरसेवक, अधिकारी संभ्रमातः सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर इच्छुकांमध्ये उत्सुकता
बिहार, गुजरातमध्येही तपास
बालगृहात नोंद पत्यावर गेले असता कुटुंब घर सोडून गेल्याचे समजले. नातेवाईक आणि आसपासच्या लोकांकडून माहिती गोळा करण्यात आली. पोलिस संदीपच्या घरी पोहोचले असता तो अमला येथेच खारी रैयत नावाच्या गावामध्ये एका शेतात मजुरी करीत असल्याचे समजले. तसेच बिहारला गेले असता रज्जीच्या आईने तो आपल्या वडिलांसोबत गुजरातमध्ये रहात असल्याचे समजले. पोलिस गुजरातला गेले असता वडिलांनी सांगितले, काही दिवस सोबत राहिल्यानंतर रज्जी निघून गेला. त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून पोलिसांनी रज्जीला केरळच्या काजीकोड जिल्ह्यातून शोधून काढले. तो कामाच्या शोधात केरळला गेला होता.
Raj Thackeray : मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा; शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये! मुंबईत मनसेच्या मेळाव्यात फटकेबाजी
अपहरण झाल्याचे नकारले
आता दोघांचेही वय 20 आणि 19 वर्ष आहे. चौकशीत दोघांनीही अपहरण झाल्याचे नाकारले. प्रयत्नांची पराकाष्ठा करून पोलिसांनी 7 वर्षानंतर दोघांनाही शोधून काढले. ही कारवाई डीसीपी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात पोनि नंदा मनगटे, सपोनि गजानन चांभारे, रेखा संकपाळ, पोहवा ज्ञानेश्वर ढोके, मनीष पराये, राजेंद्र अटकले, सुनील वाकडे, शरीफ शेख, ऋषिकेश डुमरे, आरती चौहान आणि पल्लवी वंजारी यांनी केली.