नागपूरः पाच सहा दिवसांच्या विश्रांतीनगर नागपुरात पावसाळी ढग पुन्हा सक्रिय झाले आहेत. शनिवारपासून पावसाची सुरुवात झाली असून पुढील दोन दिवस म्हणजेच आज आणि सोमवारी पाऊस राहणार असून मंगळवारी आणि बुधवारी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याचे जारी केला आहे.


शनिवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावत पुनरागमन केले. पावसाने विविध भागात तासभरापेक्षा जास्त झोडपले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच फजिती झाली. मात्र पावसाने  विश्रांती दिल्यावरही प्रशासनाने उपाय योजना केली नसल्याचेही गल्लो-गल्ली आणि मुख्य रस्त्यांवर साचलेल्या पाण्याच्या डबक्यांनी उघड केले. शनिवारी रात्री 8.30 पर्यंत 22.6 मि.मी. पावसाची नोंद झाली.


पुन्हा सक्रियता वाढली


शनिवारनंतर रविवारीही दुपारच्या सुमारास पावसाळी वातावरण होऊन काही वेळासाठी जोरदार पाउस झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून ट्रफ पुन्हा दक्षिणेकडे सरकला आहे. शिवाय बंगालची खाडी व अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने विदर्भासह महाराष्ट्रात मान्सूनची सक्रियता पुन्हा वाढली आहे. नागपूरला आज म्हणजेच 7 आणि उद्या हल्का पाऊस आणि 9 आणि 10 ऑगस्टला अत्याधिक पावसाचा ऑरेंज अलर्ट विभागाने जाहीर केला आहे. या काळात जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.


नागपूरसह काटोल आणि रामटेकमध्येही जोरात


दरम्यान नागपूरसह काटोल आणि रामटेक तालुक्यात जोरात पाऊस झाला. सकाळी 8.30 पर्यंत काटोलमध्ये विदर्भातील सर्वाधिक 76.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. नागपूर शहरात 1 जूनपासून आतापर्यंत 769.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत तो 42 टक्के अधिक आहे. पावसाळ्यातील एकूण सरासरीपैकी 75 टक्के पाऊस आतापर्यंत बरसला आहे.


या भागांना बसला फटका



  • अजनी येथील केंद्रीय विद्यालयातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून सायकल काढताना, पायी निघताना चांगलीच कसरत करावी लागली.

  • चंद्रमणीनगरातील नाला ओव्हर फ्लो झाला. नाल्याचे पाणी साचल्याने अजनी पोलिस स्टेशन ते रामेश्वरी रस्ता जलमय झाला. परिणामी हा रस्ताच बंद पडला.

  • याच भागातील जोशीवाडी येथील सार्वजनिक शौचालय परिसरातील अनेक नगरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.

  • रेल्वे पोलिस मुख्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचले. पाणी थेट कार्यालयात शिरल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.