Nagpur News : नागपूरातील गोरोवाडा वन्यजीव बचाव केंद्रमधील चार वाघ आणि चार बिबटे यांना गुजरात येथील जामनगर वन्यजीव बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती वन विभागाने दिली असून यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्यानंतरच ही प्रक्रिया पार पडली असल्याचेही वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या स्थलांतरणाला सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता.
या वन्य प्राण्यांच्या स्थलांतरणासाठी आवश्यक महाराष्ट्र सरकारच्या वन विभाग आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची रीतसर परवानगीही घेण्यात आली होती. महाराष्ट्रातील वन्य प्राण्यांना गुजरातला हलविण्यात येणार असल्याचे वृत्त कळाल्यावर पर्यावरण प्रेमींनी वनमंत्री यांना सोशल मीडियावर जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. यावर वन विभागाने आपले म्हणणे सादर केले आहे. गुजरातमधील जामनगरला या वाघ आणि बिबट्यांचे कोणतेही प्रदर्शन केले जाणार नसून त्यांना फक्त रेस्क्यू सेंटरला ठेवणार असल्याचे स्पष्टीकरण वन विभागाने दिले आहे.
गोरेवाड्यात जागा कमी?
गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात मानव वन्यजीव संघर्षानंतर बंदिस्त केलेलं अनेक वन्य प्राणी ठेवले जातात. त्यामध्ये वाघ आणि बिबट्यांची संख्या लक्षणीय असते. गेले काही आठवड्यात नागपूरच्या केंद्रात वाघ आणि बिबट्यांची संख्या वाढल्याने जागेअभावी इतर राज्यांनी मागणी केल्यानंतर हे प्राणी तिथे पाठवण्यात आल्याची माहिती वन संरक्षक एस. युवराज यांनी दिली. मात्र, कॅमेऱ्यासमोर त्यांनी बोलण्यास नकार दिला.
काही दिवसांपूर्वी दोन वाघ बोरिवलीतील उद्यानात
काही दिवसांपूर्वी गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातून दोन वाघ हे मुंबईतील बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले होते. तर, गुजरातच्या जामनगर येथील रेस्क्यू सेंटरने गोरेवाडा येथील वाघ आणि बिबट्यांसाठी दोन महिन्यांपूर्वी मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे वन विभाग तसेच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची रीतसर परवानगी घेऊन हे प्राणी जामनगरला पाठवण्यात आले आहे.
पर्यावरण आणि प्राणीप्रेमींकडून विरोध
प्राण्यांना नागपूरातील रेस्क्यू सेंटर, महाराज बाग किंवा बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान येथे ठेवता आले असते. मात्र राज्य सरकारची उदासिनता असल्याने विशेष प्लॅनिंगद्वारे महाराष्ट्रातील प्राणी इतर राज्यात हलविण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरणवादी आणि प्राणीप्रेमींनी लावला आहे.
ही बातमी देखील वाचा...