नागपूर : सापाला हाताळण्याचा कोणताही अनुभव नसताना सापासोबत केलेली गंमत एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात सोमनाळा गावात 21 वर्षांच्या श्रीराम डहारे या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.


16 नोव्हेंबर रोजी श्रीरामला घरालगतच्या झुडपात एक विषारी नाग आढळला होता. श्रीरामने त्याला पकडले आणि लोकांना आपण किती साहसी आहोत हे दाखवण्यासाठी तो सापाला घेऊन अंगाखांद्यावर खेळवू लागला. कधी गळ्यात तर कधी हातात धरुन तो गावात फिरत होता. सापाला दूध पाजत असताना अनेकांनी त्याचे व्हिडीओही बनवले. काहींनी त्याला सर्प मित्र म्हटले, तर काहींनी त्याच्यावर देवाची कृपा असल्याचा कांगावा केला.


मात्र, याच दरम्यान, विषारी नागाने श्रीरामला डसले. मात्र, लोकांच्या खोट्या कौतुकाला खरं मानून श्रीराम डहारेने त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने सापाच्या विषाचा त्याच्या शरीरावर परिणाम दिसू लागला आणि श्रीरामाची तब्येत बिघडली. कुटुंबियांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.


Nagpur Snake Bite | अनुभव नसताना विषारी सापाशी खेळ केला आणि जीव गमावला