Nagpur Violance Update : उपराजधानी नागपूर (Nagpur) शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील (Nagpur Violance) कारवाईसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुढे आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील फूटप्रिंटसच्या आधारे नागपूर पोलिसांनी (Nagpur City Police) नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 113 वर पोहोचली आहे. 


फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव, हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं


नागपूर शहरातील (Nagpur) हिंसाचार घटनेतील कथित मास्टर माईंड फहीम खान यांच्या घरावरही महापालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली. यात महापालिकेनं नागपूरच्या टेकानाका परिसरातील घर बांधताना फहीम खानने (Fahim Khan) काही भागात अतिक्रमण केलं होतं. यासंदर्भात नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला ही सुरुवात केली होती. मात्र, नागपूर (Nagpur) पालिकेच्या कारवाई विरोधात फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात (Highcourt) धाव घेतली. त्यावर, तत्काळ सुनावणी करताना न्यायालयाने महापालिकेकडून सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला स्थगिती दिली आहे. तसेच, अतिक्रमण कारवाई विषयी सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचे उल्लंघन महापालिकेकडून होत असल्याचा दावा हायकोर्टात दाखल याचिकेतून करण्यात आला होता. दुसरीकडे नागपूर पोलिसांनी मात्र घटनेतील आरोपींवर कारवाईचे सत्र सुरुचे ठेवले आहे. 


 सोशल मीडियावरील फुटप्रिंट्सच्या आधारावर अटक सत्र सुरूच! 


पुढे आलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शारिक रजा, मोमीन मोहम्मद फिरोज खान आणि शोएब मोहम्मद बेग अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हिंसाचार घडला त्या दिवशी रात्रीचे विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तसेच सोशल मीडियावरील फुटप्रिंट्सच्या आधारावर सध्या नागपूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. आणि त्या आधारावरच पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या एकूण आरोपींपैकी आतापर्यंत 36 आरोपींची पोलीस कोठडी संपली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर एकूण 113 आरोपींपैकी 12 आरोपी अल्पवयीन म्हणजेच विधी संघर्ष बालक असल्याने त्यांच्या विरोधात त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या