Nagpur News : मी माझ्या पगारावर समाधानी आहे. आज महाराष्ट्रात लाखो रुपयांची नोटांचे बंडलचे दोन प्रकरण गाजत असताना एका अधिकाऱ्याने त्यांच्या टेबलावर लावलेली पाटी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही पाटी लावली आहे नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत अतिरिक्त महसूल आयुक्त राजेश खवले यांनी. खवले यांनी त्यांच्या कार्यालयातील टेबलावर त्यांच्या नेमप्लेटसह "मी माझ्या पगारावर समाधानी" असल्याचे लिहिले आहे. एबीपी माझानी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कॅमेरावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र माझं कार्यक्षेत्र विदर्भातील अनेक जिल्ह्यात विस्तारलेलं असून ग्रामीण भागातील अनेक लोक कामानिमित्ताने भेटायला येतात. त्यांना माझ्या कार्यपद्धतीचा सुस्पष्ट संदेश मिळावा, यासाठी ही पाटी लावल्याचे खवले म्हणाले.
Krupal Tumane: देशातील नोकरशाही जर अशा पद्धतीने वागायला लागली तर आपला देश अमेरिकेच्याही पुढे जाईल
दरम्यान, आज सकाळपासून राज्यात राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे संकेत देणारे दोन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये खवले यांनी लावलेली त्यांच्या टेबलावरील पाटी एक आशादायक चित्र दाखवणारी आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी ही अत्यंत चांगली बाब आहे, या देशातील नोकरशाही जर अशा पद्धतीने वागायला लागली तर आपला देश अमेरिकेच्याही पुढे जाईल. असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या वेतनावर समाधानी राहिलेच पाहिजे. कारण सातव्या वेतन आयोगानंतर सर्वांना खूप चांगला पगार मिळतो आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी या चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे. असेही कृपाल तुमाने (Krupal Tumane) म्हणाले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा विधीमंडळावर निघाला चॉकलेट मोर्चा
11 महिने प्रशिक्षण देऊन सरकारने हजारो तरुणांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेनं विधीमंडळावर चॉकलेट मोर्चा काढलाय. यावेळी युवक आंदोलकांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आरोप केले आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण" योजनेअंतर्गत तरुणांना वेगवेगळ्या विभागात सहाय्यक या पदावर घेऊन त्यांना मानधन देण्याची योजना राबवण्यात आली होती. त्यामध्ये हजारो तरुणांनी सहभागी होत प्रशिक्षण घेतले होते. मात्र, महायुती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर या प्रशिक्षणार्थींच्या मानधन थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे आज या सर्व युवा प्रशिक्षणार्थींनी नागपुरात एकत्रित येत सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी अभिनव असा चॉकलेट मोर्चा काढलाय. सरकारने आम्हाला फक्त चॉकलेट दिलंय, असा आशय त्यामागे होता.
आणखी वाचा