मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी देखील झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. मुंबई पोलीस वांद्रे येथील झिशान सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. 12 ऑक्टोबर 2024 ला बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा झिशान सिद्दिकी यांना धमकी आल्यानं, सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे.
बाबा सिद्दिकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या प्रकारे तुझी हत्या करण्यात येईल असा धमकीचा मेल झिशान सिद्दिकी यांना पाठवण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांच्याकडून याबाबत मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. डी गँग चा उल्लेख करत जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू असा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांना गेल्या 2 दिवसांपासून धमकीचे मेल येत असल्याची माहिती आहे. या मेलमध्ये 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. रिमायंडर साठी प्रत्येकी 6 तासांनंतर मेल करणार असल्याचा उल्लेख आहे.
वांद्रे पोलिसांकडून चौकशी सुरु
झिशान सिद्दिकी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचे मेल आल्याची माहिती आहे. डी गँगचा उल्लेख करत जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू अशी धमकी झिशान सिद्दिकी यांना देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या 2 दोन दिवसांपासून झिशान सिद्दिकींना धमकीचे मेल येत आहेत. या मेलमधून सिद्दिकी यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. प्रत्येकी 6 तासांनंतर आठवण करुन देण्यासाठी मेल पाठवणार असल्याचा उल्लेख आहे. सध्या वांद्रे पोलीस झिशान सिद्दिकी यांच्या घरी दाखल झाले असून त्यांच्याकडून जबाब नोंदवणं सुरु आहे.
झिशान सिद्दिकी यांना यापूर्वी देखील धमकी देण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर दसऱ्याच्या दिवशी गोळीबार करण्यात आला होता. त्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. हे सुरु असतानाच झिशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे.