मुंबई : पोलिसांला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसालाच फोन करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. राम कदम यांनी आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांना फोन करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज युवासेनेने मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी अडीच वाजता आंदोलन करणार आहे.


मुंबईतील पवई पोलीस स्टेशनचे कर्मचारी नितीन खैरमोडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अमानुष मारहाण केली. दिपू तिवारी, सचिन तिवारी आणि आयुषा राजभर अशी आरोपींची नावं आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक केली. मात्र काही तासांच्या आत आमदार राम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन आरोपींना सोडण्याची विनंती केली. ही बाब समजताच शिवसेनेने राम कदम यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. राम कदम यांच्या निषेधार्थ युवासेना आज मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे.


घाटकोपर पश्चिम स्टेशन रोड, वरळी नाका, दादरमधील शिवसेना भवन, कांदिवली पूर्वेतील शिवसेना शाखा क्र. 24, वांद्र्यातील चेतना कॉलेज, अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक आणि गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकाजवळ ही आंदोलनं होणार आहेत.


काय आहे प्रकरण?
पवई हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एक ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणारे भाजपचे कार्यकर्ते धडकले. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभरला ताब्यात घेतले. रिक्षाने जात असताना आरोपींनी नितीन खैरमोडे यांना रिक्षातच मारहाण केली. शिवाय त्यांच्या तोंडावर आणि गालावर हातातील कडे मारले.


राम कदम आणि नितीन खैरमोडे यांच्यातील फोनवरील संभाषण
पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक केल्यानंतर काही तासातच राम कदम यांनी नितीन खैरमोडे यांना फोन केला. "त्या दिपूने केलं ते ते चूकच आहे. त्याचं समर्थन करु शकत नाही. अजून त्याचं लग्न पण झालं नाही, करिअर पण सुरु झालेलं नाही. पण आता ज्या पद्धतीचे कोर्टात केस स्टँड झाल्याचे आपण पाहिलेच आहे. त्याच्या दोन थोबाडीत मारा, पण आपसात ही केस सोडवण्याचा प्रयत्न करा," असं राम कदम नितीन खैरमोडे यांना म्हणाले. परंतु आरोपींनी मला आई-बहिणींवरुन शिव्या दिल्या. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर चुकीचा संदेश समाजात जाईल, त्यामुळे आरोपींना शिक्षा व्हावी ही माझी इच्छा आहे," असं सांगत खैरमोडे यांनी तक्रार मागे घेण्यास नकार दिला.


पोलिसांन मारहाण करणाऱ्यांना सोडा म्हणणं दुर्दैवी : एकनाथ शिंदे
दरम्यान, शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, "कोविड काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरुन काम केलं. यात कितीतरी पोलीस शहीद झाले. असं काम करणाऱ्या पोलिसांना मारहाण केली जाते. मारहाण करणाऱ्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे कृत्य निषेध करण्यासारखं आहे. मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचं संरक्षण पोलीसच करतात आणि त्यांना मारहाण करणाऱ्यांना सोडा असं म्हणणं हे दुर्दैवी आहे."


Mumbai Police | पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी राम कदमांचा पोलिसांनाच फोन