कल्याण : कल्याण पूर्व येथे शनिवारी युवा सेना सचिव वरूण देसाई यांनी पदाधिकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. सायंकाळी सहा वाजल्यानंतर वरूण सरदेसाई तेथून निघून गेले. त्यानंतर कल्याण पूर्वेतील युवासेना अध्यक्षाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ही मारहाण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे आरोप युवा सेना शहर अध्यक्षांनी केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. तर याबाबत माहिती घेऊन जो कोण दोषी असेल त्याच्यावर  कारवाई करणार असल्याचे वरूण सरदेसाई यांनी सांगितले आहे.


गेल्या दोन दिवसांपासून युवासेना सचिव वरूण सरदेसाई कल्याण लोकसभेत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान सरदेसाई यांनी युवा सेनेत पदांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची मुलखाती घेतली. शनिवारी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शिवसेना शाखेत सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांचा मुलाखती घेतल्या. कल्याण पूर्वचे युवासेना अधिकारी संजय मोरे हे वरूण सरदेसाई यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर संजय मोरे हे आपल्या घरी जात असताना शिवसेना शाखेच्या पाठीमागे पायी जात असताना  मोरे यांना मारहाण करण्यात आली. 


संजय मोरे यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात मोरे यांनी तक्रार अर्ज स्थानिक पोलिस स्टेशन, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि पक्षातील नेत्यांना  देऊन न्यायाची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे या प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे याबाबत महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, युवा सचिव वरूण सरदेसाई यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल अस स्पष्ट केलं आहे.