शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. शिवसंग्रामचा कार्यकर्ता असलेल्या मामासोबत सिद्धेश बोटीने निघाला होता. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला.
सिद्धेश सुभाष पवार हा मूळचा कोकणातल्या खेड तालुक्यातल्या गुणदे गावचा आहे. तो मुंबईत सांताक्रुझच्या वाकोला परिसरातल्या ओमकार इमारतीत राहत होता. सिद्धेशच्या अपघाती निधनाने खेड तालुक्यासह साऱ्या रत्नागिरी जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे.
आई-मावशीनंतर सिद्धेशचाही अपघाती मृत्यू
सिद्धेश हा सिद्धगिरी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा दत्ताजी आंब्रे यांचा नातू आहे. दत्ताजी आंब्रे यांच्या दिवंगत कन्या नंदा सुभाष पवार यांचा सिद्धेश हा मुलगा. नंदा पवार आणि त्यांची बहीण सुषमा म्हामुणकर यांचंही काही वर्षांपूर्वी महाडमधल्या कार अपघातात निधन झालं होतं. त्यामुळे सिद्धेशचं अपघाती झालेलं निधन हा पवार आणि आंब्रे कुटुंबियांवर झालेला दुसरा मोठा आघात आहे.
सिद्धेश हा त्याचे सख्खे मामा आणि शिवसंग्रामचे कार्यकर्ते विक्रांत आंब्रे यांच्यासोबत शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी गेला होता. बोट अपघातात विक्रांत आंब्रेही जखमी झाले आहेत.
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह
सिद्धेश हा व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट होता. तो गेलं वर्षभर सीएची प्रॅक्टिस करत होता. सिद्धेशचं शालेय शिक्षण परशुरामच्या एसपीएम इंग्लिश हायस्कूलमध्ये झालं होतं. तो दहावीत रत्नागिरी जिल्ह्यात पहिला आला होता, अशी आठवण खेडवासीय सांगतात. सिद्धेशचं पाच-सहा महिन्यांआधी लग्न झालं आहे.
शिवस्मारक पायाभरणी : बुडणाऱ्या बोटीवरील तरुण सांगतो..
स्पीडबोटच्या अपघातानंतर सिद्धेश बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली होती. सिद्धेशविषयी माहिती मिळताच त्याचे मामा विक्रांत आंग्रे बेशुद्ध पडले होते. बोट किनाऱ्यावर आणल्यानंतर दुर्दैवाने सिद्धेशचा मृतदेहच आढळला.
मुख्यमंत्र्यांकडून मयत सिद्धेश पवारच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची स्पीडबोट दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला होता. त्यानंतर शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी आयोजित आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
नियोजनशून्यतेचा बळी
दरम्यान, नियोजनशून्यतेमुळे हा अपघात झाल्याची टीका शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत बसवल्याचा आरोपही पाटलांनी केला. बचावकार्यासाठी आपण दोन बोटी पाठवल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली. पायाभरणी कार्यक्रमाला जाताना तटरक्षक दलाला सोबत का नेलं नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पाहा अपघातग्रस्त बोटीचे फोटो
शिवस्मारक पायाभरणीला जाताना बुडालेल्या स्पीडबोटमधून एक जण वगळता सर्वांना वाचवलं, वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.