ठाणेः मुंबई महापालिकेच्या काळ्या यादीतील कंत्राटदारांना ठाणे महापालिकेनं दिलेली कंत्राट रद्द करावी, अशी मागणी करत मनसेनं जोरदार आंदोलन केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात घोषणाबाजी केली.
मनसेने पालिका प्रशासनाला निवेदन देऊन काळ्या यादीतील कंत्राटदारांची कामं त्वरीत रद्द करण्याची मागणी केली. मुंबई महापालिकेनं जे. कुमारसह 3 बड्या कंत्राटदारांची नावं काळ्या यादीत टाकली. मात्र याच वादग्रस्त कंत्राटदारांना ठाणे महापालिकेनं 200 कोटींची कामं दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.
महापालिकेने ही कंत्राट रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला. मुंबई महापालिकेचा रस्ते घोटाळा एकीकडे गाजत असतानाच ठाणे महापालिकेच्या प्रशासनावर मनसेने हा गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.