भिवंडी : भिवंडी शहरातील घुंगटनगर परिसरात मित्रांसोबत बसलेल्या युवकाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत युवकाच्या हातातील बोट फॅक्चर झाली आहेत. विशाल गुप्ता असं पोलिसांकडून मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे


भिवंडी शहरातील शहर पोलिस स्टेशनअंतर्गत असेलेल्या घुंगटनगर परिसरात आपल्या घराशेजारी मित्रांसोबत बसलेले असतांना काही तृतीयपंथी त्या ठिकाणी आले. त्यांच्याशी या युवकांचा किरकोळ वाद झाला. वाद वाढू नये यासाठी विशाल गुप्ता या युवकाने सदर घटना शहर पोलीस ठाण्यात फोनद्वारे कळवली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत वाद घालणारे तृतीयपंथी व युवकांनी तेथून पळ काढला.



मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी फोन करणाऱ्या विशाल गुप्ताला लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. या युवकासह आणखी दोन ते तीन युवकांना पोलिसांनी मारहाण केली. या मारहाणीत एका युवकाचं हाताचं बोट फॅक्चर झालं आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


या मारहाणप्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे यांना विचारणा केली असता पोलिसांनी मारहाण केली नसल्याचं सांगत युवकाचे आरोप त्यांनी फेटाळला. या उलट तक्रार करणाऱ्या युवकानेच पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.