कल्याण : प्रेम विवाह केल्याच्या वादातून एका तरुणाला दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ परिसरात ही घटना घडली आहे. भरदिवसा घडलेला हा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला असून या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात एकच खळबळ उडाली आहे .याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत यामधील जगदीश मूनगर व कालिदास कोळी दोन आरोपीना गजाआड केलं आहे, तर इतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 


विजय नवलगिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचे काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमविवाह झाला होता. अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोड आंबेडकर नगर परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये विजय पत्नीसह राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातल्या काही तरुण "तू आमच्या भागातील मुलीशी प्रेम विवाह का केला?" असा सवाल करत त्याला सतत धमकावत होते.




आज दुपारच्या सुमारास काही तरुण विजयच्या राहत्या घरी गेले. त्यांनी विजयला बाहेर बोलावून त्याला जबर मारहाण केली. इतकेच नव्हे तर काही जणांनी निर्दयीपणे दगडाने मारहाण केली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या विजयला अत्यंत क्रूरपने रस्त्यावर फरफटत नेले. त्यानंतर मारहाणीत गंभीर जमखी झालेल्या विजयचा मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरु असताना एका अज्ञात वाटसरूने हा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित केला आहे. 


घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ शिवाजी नगर पोलिसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहताच आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पळून जात असताना दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.