ठाणे : ठाण्यात (Thane News Update) 24 तासात 4 किशोरवयीन मुलांना पोहण्याच्या मोहापायी जीव गमवावा लागला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या नील तलावात या चौघांना प्राणाला मुकावे लागले आहे. काल 2 जण बुडून मृत पावल्यानंतर आज देखील सकाळी याच तलावात पोहायला गेलेल्या किशोरवयीन मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीवाला मुकावे आहे. त्यामुळे या तलावाकडे जाणाऱ्या मार्गांवर पोलीस किंवा सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. येऊरचा हा तलाव (Yeoor lake in Thane) 'मौत का कुंआ' बनलाय असेही म्हटले जात आहे. 


सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास येऊरच्या पाटोणपाडा येथील नील तलावात पोहण्यासाठी 5 ते 6 मुलं आली होती. त्यापैकी तेजस प्रमोद चोरगे (17) आणि ध्रुव कुळे (17) या दोघांनी प्रथम तलावात उडी घेतली. मात्र त्यांना तलावात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पुन्हा वर आलेच नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या इतर मित्रांनी मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला बोलावले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. मात्र यश मिळत नसल्याने टीडीआरएफ टीमला बोलावण्यात आले. त्यांनी अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या मदतीनं सहाय्याने दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास तेजसचा मृतदेह बाहेर काढला. मात्र ध्रुवचा मृतदेह शोधण्यास आणखीन कष्ट घ्यावे लागले. अखेर शोध पथकाने स्कुबा ड्राइव्हचा वापर करून संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ध्रुव याचा मृतदेह शोधण्यात पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाला यश लाभले. 


हा येऊरचा तलाव 'मौत का कुंआ' बनलाय की काय असा प्रश्न विचारला जात आहे. कारण याच तलावात काल सकाळी आणि दुपारी मजा मस्तीसाठी आलेल्या 2 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ते देखील आपल्या मित्रांसोबत पोहायला आले होते मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज त्यांना आला नाही. तसेच याआधी अनेकांना या तलावात जलसमाधी मिळाली आहे. नील तलाव हा प्रतिबंधित क्षेत्रात येतो तरीही चोर वाटेने अनेक तरुण या तलावात पोहण्यासाठी येतात आणि जीव गमावतात. त्यामुळे हे सर्व रस्ते बंद करून तिथे पोलीस किंवा सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी करण्यात येत आहे.