कल्याण : केकमध्ये अळी आढळल्याचा किळसवाणा प्रकार कल्याण जवळच्या अंबरनाथ शहरात समोर आला आहे. याप्रकरणी केक विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अंबरनाथ पश्चिमेच्या 'ओ केक' नावाच्या दुकानात हा प्रकार घडला. या दुकानातून संगीता झेंडे यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी केक विकत घेतला होता. मात्र केक कापून मैत्रिणींना खाऊ घालत असतानाच एका मैत्रिणीला त्यात अळी असल्याचं दिसलं. त्यामुळे झेंडे यांनी हा केक घेऊन तडक केकचं दुकान गाठलं.



यावेळी आधी एकाच्या ऐवजी दोन केक घेऊन जा अशा विनवणी केक विक्रेत्याने केली. मात्र नंतर मुजोरीची भाषा करत उलट उत्तरे दिली, असा आरोप करत झेंडे यांनी केकच्या दुकानाबाहेरच गोंधळ घातला. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात केक विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अन्न औषध प्रशासनानेही 'ओ केक' दुकानातून केकचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती एफडीएने दिली आहे. तर दुसरीकडे केक विक्रेता संजय सिंग याने मात्र आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आपल्या दुकानाची बदनामी करण्याचं कारस्थान असल्याचा दावा त्याने केला आहे.


आणखी वाचा