मुंबई : वरळीतील कार्यक्रमावेळी झालेल्या गोंधळानंतर आता आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे सदस्य असलेल्या सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाच्या तक्रारीनंतर सिद्धेश शिंदे यांच्याविरोदात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धेश शिंदे यांनी नारळीपौर्णिमेवेळी झालेल्या गर्दीत शिंदे गटाच्या महिला पदाधिकारीला धक्का मारल्याचा आरोप आहे.

सिद्धेश शिंदे यांच्यावर दादर पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम 115(2) अंतर्गत अदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला शाखाप्रमुखाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सबंधित तक्रारदार महिला सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे.

Worli Narali Pournima Rada : सिद्धेश शिंदेने पाठीत मारलं, धक्काबुक्की केली

याबाबत शिंदे गटाच्या शाखाप्रमुख महिला एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या की, "ज्यावेळी खाली येत होतो त्यावेळी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात गद्दार अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर गर्दीमध्ये माझ्या पाठीत कुणीतरी मारलं. मी मागे पाहिलं त्यावेळी तो सिद्धेश शिंदे होता. त्याने नंतर मला एक पंच मारला, त्यामुळे मला काही समजले नाही."

Aaditya Thackeray Worli : हा सरकारचा रडीचा डाव

सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा शिंदेंचा रडीचा डाव आहे. राजकीय सत्तेचा वापर करत आपल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

Worli Rada : वरळी कोळीवाड्यात गोंधळ आणि धक्काबुक्की

नारळी पौर्णिमेनिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी वरळीतील कोळीवाड्यात गेले. यावेळी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने आले .आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात गेलेल्या शिंदेंविरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. नंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली.

पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना जाण्यासाठी मार्ग करुन दिला. या पाच मिनिटाच्या काळात कार्यकर्ते आक्रमक झाले. एकनाथ शिंदे परतीच्या मार्गानं गेले तर आदित्य ठाकरे समुद्राच्या बाजूनं पुढं गेलं. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. अरुंद गल्लीतून दोन्ही नेते पास होत असताना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यानं मोठी घटना घडला नाही.

ही बातमी वाचा :