मुंबई: वरळीत काल (शुक्रवारी, ता 8) नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. हा सण कोळीबांधवांसोबत साजरा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे  आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहिले होते, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वरळी कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा सणाला हजेरी लावली होती. यावेळी दोन्ही नेते आमने सामने आल्याची घटना घडली होती. या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना  वेगळं करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांनी यावेळी समोरून जाताना खून्नस दिल्याचं बोललं जातंय, त्यामुळे कोळीवाड्यात तणावाचे वातावरण असून मोठा राडा झाल्याची घटना घडली. त्यावरती आज आमदार आदित्य यांनी पुन्हा एकदा शिंदेंना रडू नका, एवढी भिती होती मग वरळीत आलात का? असं म्हणत डिवचलं आहे.

फेकनाथ मिंधे यांनी हे सगळं बंद करावं

आदित्य ठाकरे याबाबत बोलताना म्हणाले, काल तुम्ही तिथे होता तुम्हालाही माहिती असेल, तिथे किती पोलीस होते. खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ मिंधे यांनी बंद करावं. राज्यात त्यांचे सरकार आहे ते आमच्यावर अर्बन नक्षल म्हणून देखील गुन्हा दाखल करतील. पण फेकनाथ मिंधे यांनी हे सगळं बंद करावं, हे रडगाणं आहे. रडीचा डाव चालू आहे. तुम्ही देखील तिथे पाहिले असेल तिथे चार चार कॅमेरे होते, आम्ही सर्वांना शांत करत होतो. तुम्ही सगळे तिथे उपस्थित होताच. मध्ये संपूर्णपणे पोलिसांची भिंत होती. इतकी भीती असेल तर तिकडे यायचं कशाला, तुम्ही तिकडे रोखून बघत होतात या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, काही झालेलं नव्हतं. मी फक्त एवढेच बघत होतो आपले सगळे कार्यकर्ते नीट आहेत ना, सगळे व्यवस्थित आहेत ना, तेवढेच. कोणाला काही व्हायला नको. कोळीवाड्यात आम्हाला शांतता पाळायची होती. काल तिथे सण होता आणि तो सण साजरा करायला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

कोळीवाड्यात एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने सामने

वरळीतील कोळीवाड्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळाली. या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना  वेगळं करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना जाण्यासाठी मार्ग करुन दिला. या पाच मिनिटाच्या काळात कार्यकर्ते आक्रमक झाले. एकनाथ शिंदे तिथून जात असताना आदित्य ठाकरे त्यांच्याकडे पाहत होते, अशी माहिती आहे. एकनाथ शिंदे परतीच्या मार्गानं गेले तर आदित्य ठाकरे समुद्राच्या बाजूनं पुढं गेलं. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. अरुंद गल्लीतून दोन्ही नेते पास होत असताना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यानं मोठी घटना घडला नाही.