Worli Hit And Run Case : मुंबई : वरळी (Worli Accident) हिट अँड रन प्रकरणातील (Hit And Run Case) आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तपासाची चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली आहे. काल मध्यरात्री मिहीर शाह, चालक राजऋषीला घटनास्थळी नेत मुंबई पोलिसांनी वरळी अपघात घटनेचं रिक्रिएशन केलं आहे. तसेच, आरोपीनं अपघातावेळी मद्यप्राशन केलं होतं, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला आहे. वयाची 25 वर्ष पूर्ण केली नसतानाही वरळी अपघातातील आरोपीनं बारमध्ये खोटं वय सांगून हार्ड ड्रिंक्स प्यायल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 


महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागानं बुधवारी बोलताना केलेल्या आरोपांनुसार, बारच्या बिलानुसार, आधारे मिहीर आणि त्याच्या मित्रांनी बारमध्ये जंगी पार्टी केली. मिहीरनं आणि त्याच्या मित्रांनी व्हिस्कीचे एक, दोन नव्हे तब्बल 12 लार्ज पेग रिचवले. साधारणतः प्रत्येकानं 4 पेग घेतले होते. हे प्रमाण पाहता कोणीही आठ तास नशेच्या अधीन होऊ शकतं, असंही ते म्हणाले आहेत.


मुख्य आरोपी मिहीरनं दारू पिण्यासाठी बारमध्ये खोटं वय सांगितल्याचं उघड झालं आहे. मिहीर शाहच्या  प्राथमिक चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या वयाची पंचवीशी पूर्ण केलेली नसतानाही मिहीरनं बारमध्ये खोटं वय सांगितलं. दारू पिण्यासाठी मिहीरनं 27 वर्ष वय नमूद केलेलं ओळखपत्र दाखवलं होतं. 


वयाची 25 वर्ष पूर्ण केली नसतानाही वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह याला हार्ड ड्रिंक्स पुरवणाऱ्या जुहू येथील व्हाईस-ग्लोबल तापस बारचा परवाना महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागानं रद्द केला. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं बारच्या बेकायदेशीर बांधकामाचं पाडकामंही केलंय. 19 जुलै रोजी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत बारचा परिसर सील करण्यात आला आहे, असं उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


वरळी हिट अँड रन प्रकरणाचं  मुंबई पोलिसांकडून रिक्रिएशन


मुंबई पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली आहे. काल मध्यरात्री मिहीर शाह, चालक राजऋषीला घटनास्थळी नेत मुंबई पोलिसांनी घटनेचं रिक्रिएशन केलं. तसेच, आरोपी मिहीर आणि राजऋषीची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केल्याची माहिती समोर येत आहे. आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं मिहीरनं स्पष्ट केलं असल्याचं समोर आलं आहे.


माझ्या हातून चूक झाली, झालेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय 


माझ्या हातून चूक झाली, झालेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय, अशी कबुली वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शर्मानं दिली आहे. या घटनेनं माझं करिअर संपलेलं आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया चौकशीत मिहीरनं दिल्याची माहिती मिळत आहे. आरोपी मिहीर शाह आणि राजऋषी बिडावत दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. दोघांनाही रात्री अपघाताच्या ठिकाणी नेण्यात आलं होत आणि घटनाक्रम पोलिसांनी समजून घेतला. आरोपी मिहीर आणि बिडावत यांनी सांगितलेल्या आणखी काही गोष्टी पोलीस पडताळून बघत आहेत.