मुंबई : घड्याळाच्या काट्यावर चालणारं शहर अशी मुंबईची ओळख आहे. त्यामुळे न थकता मुंबईतील लोक रात्रंदिवस काम करत असतात. मुंबईत काम करणारे लोक एवढे व्यस्त आहेत की त्यांना ऑफिसमधून सुट्टी काढून फिरायला जाण्यासही वेळ मिळत नसल्याचं एका सर्व्हेतून समोर आलं आहे.


एका ट्रॅव्हल पोर्टल एक्सपीडियाने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार मुंबईतील 51 टक्के लोक कामातून सुट्टीच घेत नाहीत. कारण त्यांना ऑफिसच्या कामातून वेळच मिळत नाही. 40 टक्के लोक सुट्ट्या घेत नाहीत, कारण सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना पैसे कमावण्यात रस आहे.


जगभराच्या तुलनेत मुंबईत 27 टक्के लोक असे आहेत की जे गेल्या वर्षी सुट्टीवरच गेले नाहीत. 44 टक्के लोक असे आहेत की ज्यांनी गेल्यावर्षी 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेतल्या आहेत. तर वर्षभरात दहा दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेणाऱ्यामध्ये दिल्लीचा दुसरा क्रमांक लागतो. दिल्लीतील 43 टक्के लोक गेल्यावर्षी 10 दिवसांपेक्षा कमी दिवस सुट्टीवर गेले होते.


सुट्टी न घेतल्याने मुंबईकरांना आपण यशस्वी झाल्यासारखं वाटतं, असं या सर्व्हेतून समोर आलं आहे. कारण यशस्वी लोक सुट्ट्या घेत नाहीत किंवा अत्यंत कमी सुट्ट्या घेतात. मात्र आरोग्याच्या समस्यांच्या बाबतीत मुंबईकर जास्त सुट्ट्या घेतात. जवळपास 92 टक्के मुंबईकर मानसिक आरोग्यासाठी सुट्टी घेतात, असंही या सर्व्हेतून समोर आलं आहे.