मुंबई : लोकमंगल संस्थेने बोगस कागदपत्रांच्या आधारे दुध भुकटी कारखान्यासाठी 25 कोटी रुपये अनुदान लाटल्याप्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना चांगलाच झटका बसला आहे.  लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थेला बोगस कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या अनुदान प्रकरणात तथ्य असल्याचे समोर आले आहे. 25 कोटींपैकी 5 कोटी अनुदानाची रक्कम दूध भुकटी प्रकल्पासाठी मिळाली होती ती परत घेण्याबाबत दुग्धव्यवसाय आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.



काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. सुभाष देशमुख यांच्या संस्थेने बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. राज्य सरकारकडून राष्ट्रीय विकास कार्यक्रमाअंतर्गत कृषी संस्थांना अनुदान मिळते. याचा फायदा घेत सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट सहकारी संस्थेला 24.81 कोटीचं अनुदान मंजूर झालं त्यातीत पाच कोटी त्यांच्या संस्थेला मिळाले होते.


तसेच दुध भुकटी बनवण्यासाठी ज्या संस्थांची नावे दिली त्या बंद आहेत, तर काही संस्था अस्तित्वातचं नाही. अनुदान मिळवण्यासाठी जी कागदपत्र सादर करण्यात आली ती देखील बनावट असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला होता.  त्यामुळे आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली होती.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला समंतीपत्र देशमुखांच्या संस्थेने सादर केले होते. मात्र ते बनावट असल्याचं प्रदुषण मंडळाने स्पष्ट केलं आहे. याशिवाय अकृषीक प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं नसल्याने तेही बनावट असून त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा खोट स्टॅम्प असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला होता.

लोकमंगलने दूध भुकटीसाठी बनावट कागदपत्रे सादर करुन अनुदान लाटल्याप्रकरणी चौकशीचे निर्देश देणाऱ्या, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त आर.आर. जाधव यांची बदली करण्यात आली होती. जाधव यांची बदली केल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला होता.