>> संतोष आंधळे


मुंबई : एकाच व्यक्तीने जिवंतपणी तीन हृदयाचा अनुभव घेतला असे म्हटले तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. 39 वर्षाच्या बंगलोर येथे राहणाऱ्या रीना राजू या महिलेने तीन हृदयाचा अनुभव घेतला असून ती तिच्या तिसऱ्या हृदयाबरोबर मजेत आयुष्य जगत आहे. रीना भारतातील एकमेव व्यक्ती आहे तिच्यावर आजपर्यंत दोनदा हृदय प्रत्यारोपण करण्यात आले आहे. पहिल्या हृदय प्रत्यारोपणानंतर जागतिक प्रत्यारोपण खेळामध्ये भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या रीनाचा आयुष्याचा प्रवास खडतर असला तरी जे काही आयुष्य मिळाले आहे ते तिने हृदय प्रत्यारोपण आणि सगळ्यांनीच आपल्या हृदयाची काळजी घेतली या मोहिमेकरिता वाहून घेतले आहे. दुसरे हृदयाचे प्रत्यारोपण होऊन रिनाने नुकतेच आठ दिवसापूर्वी 22 सप्टेंबर रोजी तीन वर्ष पूर्ण केले आहे.


11 वर्षांपूर्वी रीनाला हृदयाचा असाध्य त्रास सुरु झाला तिला चालताना धाप लागायला लागली. डॉक्टरांनी सगळ्या चाचण्या केल्यानंतर तिला हृदयाचा असाध्य आजार झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी डॉक्टरांनी तिचे निदान 'डायलेटेड कार्डियोमायोपॅथी' असे केले. या आजारात हृदयाचे स्नायू कुमकुवत होतात. हृदयाची पंपिंग क्षमतेमध्ये बिघाड होऊन ती कमी होते. यामध्ये हृदय कोणत्याही क्षणी बंद पडण्याचा धोका असतो. जेव्हा गोळ्या औषधे देऊन हा आजार बरा होत नाही त्यावेळी हृदयाचे प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग असतो. रीनामध्ये नेमकं हेच घडलं होतं. तिला हृदय प्रत्यारोपणाचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.


हृदयरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार रीना आणि तिच्या कुटुंबियांनी तिच्या प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. त्यानंतर या अवघड हृदय प्रत्यारोपणासाठी तिने थेट चेन्नई गाठले. तेथे ती फ्रंटियर लाईफलाईन हॉस्पिटल येथे दाखल झाली. कारण त्याकाळात देशात फार कमी प्रमाणात अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया सर्व ठिकाणी होत नव्हत्या. रीना आणि तिचे कुटुंबीय या रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ के एम चेरियन यांना भेटले. त्यांनी तिला या आजरासंदर्भातील सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. त्यावेळी अवयवदान जनजागृती फार नसल्यामुळे ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय मिळणे ही बाब आव्हानात्मक होती. मात्र चेन्नई आणि तामिळनाडू राज्यात बऱ्यापैकी त्यावेळी जनजागृती निर्माण झाली होती. रिनाचे नाव राज्याच्या अवयव मिळण्याच्या प्रतिक्षयादीत नोंदवण्यात आले. काही काळ गेल्यानंतर रीनाला शेवटी ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय मिळाले. तिच्या हृदय प्रत्यारोपणाची 10-12 तासाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि नवीन हृदयसह ती पुन्हा जगण्यास सज्ज झाली. त्यानंतर काही काळ चेन्नईला घालवल्यानंतर ती पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती पुन्हा बंगलोरला आली.



तिच्या या पहिल्या हृदय प्रत्यारोपणानंतर तिने यापुढील आपले आयुष्य ज्या रुग्णांना हृदय प्रत्यारोपण करावयाचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे त्यांचे समुपदेशन, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणे, त्याशिवाय अवयवदान विषयी जनजागृती करणे यासाठी तिने 'लाईट अ लाईफ-रीना राजू फाऊंडेशन' नावाच्या संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेमार्फत लोकामंध्ये जनजागृतीचे काम सुरु केले. त्यानंतर ती क्रीडा प्रकारात धावणे, सायलकलिंग जास्त रस असल्यामुळे तिचे नित्य नियमाने व्यायाम सुरुच ठेवला होता.


बंगलोर येथून फोन वरून रीना राजू यांनी एबीपी माझा डिजिटल शी बोलताना सांगितले की, "माझं आयुष्य माझं प्रवास खडतर असला तरी प्रत्येक क्षण मी जगत असते. मी रडत बसले नाही किंवा थांबले नाही उलट नव्या जोमाने कामास सुरुवात केली. माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी अनेक गरजू रुग्णांसोबत मी काम करत असते. त्याशिवाय माझ्या पहिल्या हृदय प्रत्यारोपणानंतर मी आंतरराष्ट्रीय प्रत्यारोपण खेळातील स्पर्धेत सहभागी झाली होती. रोज औषध उपचार डॉक्टरांच्या नियमित भेटी घेत असल्यामुळे मी तशी तंदुरुस्त होते. सगळं काही व्यवस्थित सुरु असताना माझ्या आयुष्यात पुन्हा 2017 साली विघ्न आले. मला पुन्हा हृदयाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी माझ्या हृदयात 'अलोग्राफ्ट वसक्योलोपॅथी' ह्या आजराचे निदान केले. यामुळे हृदय प्रत्यारोपण केलेल्या व्यक्ती मध्ये हृदय सुरु राहण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मी तात्काळ ज्या ठिकणी माझे पहिले हृदय प्रत्यारोपण झाले होते त्याच डॉक्टरांशी संपर्क साधला त्यांनी मला तात्काळ चेन्नई बोलावून घेतले आणि सर्व तपासणी नंतर मला परत हृदय प्रत्यारोपण करावे लागेल, असे माझ्या डॉक्टरांनी जाहीर केले. मला काहीच कळत नव्हते काय करावे."



रीना पुढे सांगतात की, " मला पहिल्या हृदय प्रत्यारोपणाचा अनुभव माहिती होता किती वेदनादायक हा सर्व प्रकार असतो. यावेळी डॉक्टरांनीच सांगितल्या प्रमाणे सर्व ऐकत मी दुसऱ्या प्रत्यारोपणास तयार झाली आणि ब्रेन डेड व्यक्तीच्या हृदयाची वाट बघत असतानाच मी 22 सप्टेंबर 2017 रोजी दुसऱ्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सामोरी गेले. माझ्या प्रत्यारोपण त्याच डॉक्टरांनी केले ज्यांनी माझे पहिले प्रत्यारोपण केले होते. माझ्यावरील प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मी रुग्णालयात असतानाच मला कळाले होते की भारतात अशा प्रकारची दुसरे प्रत्यारोपण झालेली मी एकमेव व्यक्ती आहे. रीनाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही करण्यात आली आहे. त्यानंतर माझं हे दुसरे हृदय घेऊन पुन्हा बंगलोर परत आली असून माझं काम नित्य नियमाने सुरु केले आहे. दुसऱ्या हृदय प्रत्यारोपणास तीन वर्षे पूर्ण झाले आहे. डॉक्टरांच्या मते मी नित्य नियमाने व्यायाम करत असल्यामुळे दुसरे प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचे सांगतात. मी सर्व डॉक्टर टीम, शुभचिंतक आणि विशेष म्हणजे मला त्याच्याकडून 'हृदय' मिळाले आहे त्या कुटुंबियांचे मी आभारी आहे. "


रीना यापुढील आयुष्य हे सध्या 'परवडणारे हृदय प्रत्यारोपण' आणि औषधे या मोहिमेवर सध्या काम करत आहे. लोकांना एक प्रत्यारोपणास 30-35 लाख खर्च येतो,नंतर प्रत्यारोपणानंतर वर्षभरासाठी 1.70 ते 2 लाख खर्च येतो दर तीन महिन्याने डॉक्टरांचा फॉलोअप, दर महिन्याला 15-20 हजारांची औषधे, वर्षातून एकदा हृदयाची बायोप्सी त्यालाच एक लाख खर्च येतो. ह्या सगळ्या गोष्टी रुग्णांना परवडल्या पाहिजे त्यासाठी आणखी मोठे काम करत राहणार आहे. देशभरातील मुख्य अवयवदान कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेकवेळा रीनाच्या विशेष संवादाचे आयोजन केले जाते.