कल्याण : कामचुकारपणाची तक्रार केल्यामुळे कामगारांनी सुपरवायझरची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याणमधील एका खासगी कंपनीत हर्षद दुगड हा सुपरवायझर म्हणून काम करत होता. तर गोपीचंद घुले आणि दशरथ साबळे हे कामगार म्हणून काम करत होते. या दोघांच्या कामचुकारपणाबाबत हर्षद याने वरिष्ठांना तक्रार केली होती, त्यामुळे त्या दोघांचा दोन महिन्यांचा पगार कंपनीने थांबवला होता.

पगाल थांबवला गेल्याच्या रागातून गोपीचंद आणि दशरथ यांनी हर्षद याला आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड परिसरात चोरीच्या बॅटरीज पाहण्याचा बहाणा करुन बोलावलं. मात्र तिथे जाताच अन्य दोन अल्पवयीन साथीदारांच्या साहाय्याने या दोघांनी हर्षदचा गळा आवळून खून गेला आणि डम्पिंग ग्राऊंडच्या नाल्यात त्याचा मृतदेह टाकून वरुन कचरा टाकून दिला.

दुसरीकडे हर्षदच्या कुटुंबियांनी तो घरी परत न आल्याने पोलिसात तक्रार केली. दरम्यान, हर्षद याने गोपीचंद आणि दशरथ यांना भेटायला जाताना त्याच्या एका मित्राला फोन लावत फोन सुरूच ठेवायला सांगितले होते. या फोन कॉलच्या शेवटी हर्षदचा 'गोपी..गोपी..' असा ओरडताना आवाज येतो आणि फोन होल्डवर जातो.

या कॉल रेकॉर्डिंग आणि फोन लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपी गोपीचंद आणि दशरथ यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन हर्षद याचा मृतदेह हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील दोन्ही आरोपी हे 18 आणि 21 वर्षांचे असून त्यांचे अन्य दोन साथीदार हे अल्पवयीन आहेत.