आज मनसेकडून महापौरांना 'शिवछत्रपतींची स्त्री निती' हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात आलं आहे. प्रत्यक्ष महापौरांनी ही भेट स्वीकारली नाही. मात्र महापौरांच्या दालनाबाहेर जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे पुस्तक ठेवलं आहे. यावर 'महापौरांना भेट' असा संदेश लिहून ठेवला आहे. तसेच, या भेटीसोबत एक निवेदनही मनसेने महापौरांना दिलं आहे. या निवेदनात महापौरांनी आपल्या कृत्याचा पश्चाताप म्हणून त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
काय म्हटलंय मनसेच्या निवेदनात?
तुम्ही मुंबईचे प्रथम नागरिक-महापौर या संविधानिक पदावर विराजमान आहात. असे असूनही महिलेचा हात धरुन पिरगळणे अशोभनीय आणि असमर्थनीय कृत्य आहे. अशा कडक शब्दांत मनसेकडून महापौरांची कानउघडणी करण्यात आली आहे.
मनसेने निवेदनात म्हटलंय की, आपण शिवछत्रपतींच्या स्वराज्यात आहोत. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महिलांना मोठा मान-सन्मान होता. आपणही तसेच वागले पाहिजे. महापौरांच्या वर्तणुकीमुळे ते 'शिवनिती'नुसार शिक्षेस पात्र आहेत. महापौरांनी केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत जाहीरपणे माफी मागावी आणि स्वतःचे आत्मपरिक्षण करावे.
महापौर विश्वनाथ महाडेश्वरांची अरेरावी, महिलेचा हात पिरगळला
सोमवारी (05 ऑगस्ट) पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ सांताक्रुझ पूर्व येथील पटेल नगरमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना स्थानिकांनी घेरलं होतं. या परिसरात तब्बल 72 तास पाणी तुंबलं होतं. मात्र, एकही लोकप्रतिनिधी येथील परिस्थिती सावरण्यास आला नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष होता. त्यातच, याठिकाणी पाणी तुंबल्यामुळे विजेचा धक्का लागून एकाच घरातील दोघांचा (आई-मुलाचा) मृत्यू झाला.
दुसऱ्या दिवशी महापौर, आमदार तृप्ती सावंत, स्थानिक नगरसेविका प्रज्ञा भुतकर यांच्यासह या परिसराची पाहणी करण्यासाठी गेले. परंतु स्थानिकांनी त्यांना परिसरात येण्यापूर्वीच रोखलं. आता तुमची गरज नाही, असे म्हणत स्थानिक महिलांनी महापौरांना चहुबाजूंनी घेरलं.
परंतु, यावेळी महापौरांनी आपल्या पदाचं भान विसरत स्थानिकांसोबत अरेरावीची भाषा सुरु केली. महापौरांची स्थानिकांसोबतची अरेरावी एका व्हिडीओद्वारे समोर आली आहे. या व्हिडीओत महापौर एका महिलेचा हात पिरगळताना दिसत आहेत.
दरम्यान, यावेळी महापौरांनी मला ओळखत नाहीस का तू? मी कोण आहे ते माहीत नाही का? नालायकपणा करु नको, दादागिरी चालणार नाही. असे म्हणत महापौर स्थानिकांना धमकावत होते. या व्हिडीओमुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांविरोधातला स्थानिकांमधील संताप आणखीनच वाढला आहे.
व्हिडीओ पाहा
व्हिडीओ पाहा