काल दुपारी सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी लोकल 2 वा 42 मिनिटांनी सुटली. लोकलने वेग पकडला असता, अचानक मुहिलांच्या कोचमधून एका मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. अन्य प्रवाशांनी तिकडे पाहिलं असता, त्यावेळी महिलांच्या कोचमध्ये एका बाजूला एक मुलगी बसलेली आणि तिच्या बाजूलाच एक मुलगा अश्लील चाळे करताना दिसला.
जितेश उतेकर या प्रवशाने तात्काळ त्याला हटकले आणि तिथून जायला सांगितले. त्यावेळी तो मुलगा दरवाज्यात येऊन उभा राहिला. जितेश उतेकर याने त्याचा फोटो काढला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. इतर प्रवासीदेखील ते सर्व बघून ओरडू लगल्याने, त्या मुलाने मस्जिद बंदर स्टेशन येण्यापूर्वीच धावत्या लोकलमधून उडी घेतली आणि पसार झाला.
आरोपी
या सर्व घटनेमुळे मुलीला प्रचंड धक्का बसला. ती प्रचंड रडू लागली. तिच्या मदतीसाठी जितेशने आरपीएफ आणि जीआरपी हेल्पलाईन नंबरला संपर्क केला, पण पोलीस येईपर्यंत वडाळा स्टेशन आले. तिथे त्या मुलीला पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. मात्र मुलगी प्रचंड घबरलेली असल्याने तिने तक्रार दिली नाही.
शेवटी ती मुलगी निघून गेली, त्यामुळे जितेशनेच तक्रार द्यायचे ठरवले. वडाळा लोहमार्ग पोलिसांनी त्याला सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडे पाठवले. मात्र तिथेही त्याची तक्रार घेतली नाही. ती मुलगीच तक्रार देऊ शकते, असे सांगून त्याला केवळ तोंडी आश्वासन दिले गेले.
शेवटी जितेशने सोशल मीडियाचा आधार घेतला. मात्र अजूनही नेमकी काय कारवाई करण्यात आली, हे गुलदस्त्यात आहे. या सर्व प्रकारामुळे लोकलमध्ये महिला अजूनही सुरक्षित नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. जितेशसारख्यांनी जी भूमिका घेतली, तशी तुम्ही-आम्ही सर्वांनी घेण्याची गरज आहे.