मुंबई : माणुसकी आणखी दृढ होईल असं काम मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा करून दाखवलं आहे. एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेत असताना तिची मुंबई पोलिसांच्या गाडीतच प्रसुती झाली. महिला आणि बाळ दोघे सुरक्षित असून पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचले.


वरळी नाका येथे 13 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एक गरोदर महिला रस्त्याने जात असताना अचानक चक्कर येऊन पडली. रस्त्यावर असलेल्या लोकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना कळवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या दोन गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या. तिथे पोहोचल्यावर पोलिसांना ती महिला गरोदर असल्याचं कळलं आणि तिला प्रसुती कळा सुरु झाल्याचं कळलं. या महिलेसोबत तिच्या कुटुंबातील किंवा तिच्या ओळखीचे कोणीही सोबत नव्हते


महिलेची प्रकृती नाजूक होती
अॅम्ब्युलन्स बोलवण्याइतका वेळ पोलिसांकडे नव्हता. क्षणाचाही विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक पाटील, महिला कॉन्स्टेबल सपकाळ, ASI मानेसह इतर कर्मचाऱ्यांनी आणि रस्त्यावरून जात असलेली पादचारी स्थानिक महिला रहिवासी प्रिया जाधव यांनी त्या महिलेला पोलिसांच्या गाडीत ठेवलं आणि नायर रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.


महिलेची प्रकृती नाजूक होती आणि तिच्या प्रसुती कळा वाढत होत्या. रुग्णालयाला जाण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे पोलिसांच्या गाडीतच प्रसुती करण्याची वेळ आली होती. गाडीमध्ये उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीतच यशस्वीपणे प्रसुती करुन घेत तिचे आणि बाळाचे प्राण वाचवले.




महिला ही सात महिन्यांची गरोदर होती मात्र वेळेपूर्वीच तिची प्रसुती झाली. आई सुरक्षित असून बाळाला दक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. वरळी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार सपकाळ, वळवी, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, लोहार या सर्व कर्मचाऱ्यांनच त्यांच्या वरिष्ठांकडून या कर्तव्यासाठी कौतुक करण्यात आलं.