मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. अधिवेशन सुरु होण्याआधीच विरोधकांनी पायऱ्यांवर ठिय्या दिला. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत विरोधकांच्या घोषणांनी झालं.


अधिवेशन हिवाळी असलं तरी मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षण, दुष्काळ आणि कर्जमाफी या मुद्द्यांनी अधिवेशन चांगलंच तापणार आहे. त्याची झलकही आज पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली.

दुष्काळ निवारणाचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही, मराठा आरक्षणाबाबत अजूनही संदिग्धता आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. 'वा रे फडणवीस तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल' अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

मराठा समाजाला ओबीसीच्या उपप्रवर्गात आरक्षण द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. स्वतंत्र कोट्यात आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही, असा त्यांचा दावा आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचे मराठा आमदारही विधीमंडळ परिसरात आक्रमक झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं बॅनर घालून आमदारांनी घोषणाबाजी केली.



मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पहिल्याच दिवशी सभागृहात पटलावर मांडला जावा, अशी मागणी विरोधीपक्षांनी केली होती. मात्र सरकार अहवाल सादर न करता थेट विधेयकाचा मसूदा तयार करुन विधेयक सभागृहात आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मसुदा तयार करण्यासाठी साधारण दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने तो 29 नोव्हेंबर रोजी सभागृहात पटलावर ठेवला जाण्याची शक्यता आहे.

मुस्लिम आरक्षणावरुन एमआयएम आक्रमक

आमच्या सेलिब्रेशनचीही तारीख सांगा, अशा मागणीचे पोस्टर एमआयएम आमदार वारिस पठाण यांनी विधानभवन परिसरात झळकावलं.  मराठा समाजासोबत मुस्लिमांच्या आरक्षणासाठीही पावलं उचला, अशी मागणी त्यांनी केली. 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार राहा, असं विधान मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाला उद्देशून केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर एमआयएमनेही पोस्टर झळकावत आपली मागणी लावून धरली आहे.



ओला-उबरवरुन विद्या चव्हाणांनी रावतेंना रोखलं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना विधानभवनात प्रवेश करतानाच रोखलं. विद्या चव्हाण यांनी रावतेंना ओला-उबर संपाबाबात जाब विचारला. या संपामुळे सामान्यांचे नव्हे तर आमदारांचेही हाल होत असल्याचं चव्हाणांनी रावतेंना सांगितलं.



समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं, यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी अखंड महाराष्ट्राला जोडण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्राला एकत्र जोडून ठेवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे या महामार्गाला त्यांचं नाव देण्यात यावं, असं शिवसेना आमदार सुनिल प्रभू म्हणाले.

पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकरवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. विधानपरिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनावर सरकारने दाखवलेल्या उदासिनतेबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.

"कॉ. माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर तब्बल 30 तास सरकारने त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क केला नाही. शिवाय 30 तासांनंतर सरकारने संपर्क करुन आणखी दोन तास थांबा, असं उत्तर कुटुंबीयांना दिलं. त्यावर सरकारने दिलगिरी व्यक्त करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं," अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती.

यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण घटनेबाबत खेद व्यक्त केला. "कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या अत्यंसंस्कराबाबत नेमकं काय झालं, याची माहिती घेत आहोत. या सर्व घटनेची दिलगिरी व्यक्त करुन, नेमकं काय झालं हे संध्याकाळपर्यंत कळेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.