मुंबई : मुंबईत 1996 साली प्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सनच्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. विझक्राफ्ट या कंपनीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी या शोसाठी 3 कोटी 34 लाख रुपयांचा करमणूक कर माफ करण्यात आला होता. मात्र, याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे विझक्राफ्टला 3 कोटी 34 लाखांचा करमणूक कर न्यायालयात जमा केला होता. हा करमणूक करात मिळालेली सूट कायम रहावी यासाठी उद्याच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
प्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सन शोचं इतक्या वर्षांनी भिजत घोंगड आता तरी बाहेर निघणार का? या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळणार आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात 1996 साली मुंबईत पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विझक्राफ्ट या एजन्सीमार्फत या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मायकल जॅक्सनाला क्लासिकल सिंगर असल्याचं दाखवत या शोसाठी 3 कोटी 34 लाख रुपयांचा करमणूक कर माफ करण्यात आला होता. मात्र, याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयातील याचिकेमुळे विझक्राफ्टने 3 कोटी 34 लाखांचा करमणूक कर न्यायालयात जमा केला आहे. करमणूक कर माफ करण्याच्या युती सरकारच्या निर्णयावर न्यायालयाने ताशेरेही ओढले होते. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारलाच दिले होते. त्यानुसार विझक्राफ्टने ही रक्कम परत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे अर्जही केला होता. आता उद्याच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या करमणूक कराची रक्कम विझक्राफ्टला परत देण्यासंदर्भात प्रस्ताव येणार असून त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यात शिवसेनेचा पुढाकार
मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे त्याकाळात सत्तेत असलेल्या शिवसेनेचा पुढाकार होता. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी स्थापन झालेल्या शिवउद्योग सेनेकडे होती. मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामागे खुद्द राज ठाकरेंचा मोठा हात होता.
मायकेल जॅक्सन जेव्हा मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित राहिले होते. खास मराठमोळ्या पद्धतीनं झालेल्या स्वागतामुळे मायकेल जॅक्सन भारावल्याची दृश्यं आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत. विमानतळावरच्या स्वागतानंतर मायकेल जॅक्सननं बाळासाहेब ठाकरेंची राहत्या घरी भेटली. त्यानंतर भारताबद्दलच्या अनेक आठवणी मायकेल जॅक्सननं लिहून ठेवल्या होत्या.