प्रत्येक निवडणुकीत आरपीआयचे कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करुन युतीच्या उमेदवाराला निवडून आणतात. नंतर तुम्ही आमदार होता, खासदार होता, मंत्री होता, पण आम्हाला काहीच मिळत नाही. महामंडळ सोडा, पण जिल्ह्याच्या कमिटीवर पण घेत नाही, अशा शब्दात आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा रोकडे यांनी नाराजी व्यक्त केली.
अचानक झालेल्या या प्रकाराने मंचावर असलेले शिवसेना भाजपचे मंत्री, खासदार, आमदार मात्र चांगलेच खजील झाले. यानंतर भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आमच्यावर नाराज असाल, तर मोदींना पाहून मतदान करा, आणि मोदींवरही नाराज असाल, तर देशासाठी मतदान करा, असं आवाहन केलं.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढे आरपीआय कार्यकर्त्यांना शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे सन्मानाने वागणूक देऊ. तुम्हाला पुन्हा तक्रार करण्याची संधी देणार नाही, असं म्हणत सारवासारव केली. या सगळ्या प्रकाराने सभागृहात मात्र मोठी खसखस पिकली होती.