नवी मुंबई : तरुणपणी साखरपुडा मोडला म्हणून आयुष्यभर लग्न न करता ब्रम्हचारी राहिलेल्या माधव पाटील यांनी अखेर 66व्या वर्षी लग्न केलं. आयुष्यभर लग्न कर म्हणून मागे लागलेल्या नातलगांचे न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिलेल्या माधव पाटील यांचे कोरोनाने डोळे उघडले. फक्त स्वतःचाच विचार न करता अर्धांगिनीच्या कुटुंबालाही माधव पाटील यांनी न्याय दिला आहे.


गेल्या महिनाभरापासून ज्या आजोबांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची टिंगल टवाळीही केली जात आहे. शेरोशायरी करून लग्न केलेल्या आजोबांची टर उडवली जात आहे. त्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माधव पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला. उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावात राहणारे माधव पाटील गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारिता करतात. रायगड मधील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, म्हातारपणी लग्न केल्यामुळे ते आणखीचं प्रसिद्ध होत आहेत.


..अन् आयुष्यभर अविवाहित राहण्याची निर्णय
आयुष्यभर लग्नच न करणाऱ्या माधव पाटलांनी वयाच्या 66व्या वर्षी का लग्न केले असेल, याबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माधव पाटील यांचे वयाच्या तिशीत लग्न ठरले होते. साखरपुढाही वाजत गाजत झाला होता. मात्र, कुठेतरी माशी शिंकली आणि झालेला साखरपुढा मोडला. यानंतर मात्र लग्न या व्यवस्थेवरील विश्वास उडालेल्या माधव पाटील यांनी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. वय वाढत होतं, घरात एकूलता एक मुलगा होता. घरात सूनबाई येईल, कामाला हातभार लागेल, खानदानाला वारस मिळेल, अशा सर्व प्रकारे माधव पाटलांना सांगूनही ते लग्नासाठी राजी झाले नाहीत. अखेर कोरोनाने माधव पाटलांचे डोळे उघडले.


..म्हणून माधव पाटील या वयात बोहल्यावर


घरात गेली 7 महिने काढणाऱ्या माधव पाटलांना एकांत खाऊ लागला. सहचारीनी असावी अशी भावना त्यांना जाणवू लागली. आईचे वय 88 वर्ष, स्वतःचे वय 66 वर्ष. त्यामुळे घरात सांभाळणारे कोणीतरी असावे. याची जाणीव झाली. यामुळे अखेर माधव पाटील यांनी 66व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संजना यांच्याशी पहिलेच लग्न झाले असले तरी संजना यांचे दुसरे लग्न आहे. घटस्पोटीत असलेल्या संजना यांचे वय 45 असून त्यांच्या माहेरी भावाचे कोरोनाने निधन झाल्याने आधार हारपला होता. त्यांनाही उतार वयात आधाराची गरज असल्याने आपल्या पेक्षा 20 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या माधव पाटील यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजोबांच्या वयातील व्यक्तीशी लग्न का करतेस याबाबत त्यांना नातेवाईक, मित्रमंडळी यांनी हिनवले. पण त्यांनी याची परवा न करता उतार वयात साथ देण्यासाठी लग्नगाठ बांधली.


सोशल मीडियावर सध्या टिकेचे, टिंगल-टवाळीचे, मजाक-मस्तीचे कारण झालेल्या माधव पाटील आणि संजना पाटील यांना त्याची परवा नाही. समाजासाठी 35-40 वर्ष खर्च करून पत्रकारीता, समाजकारण, राजकारण करून शेवटी पदरात टिकाच पडत असेल तर ती झेलायला समर्थ असल्याचे माधव पाटील सांगतात.