Lalbaugcha Raja Visarjan 2025 : मुंबईसह जगभरातील गणेशभक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या लालबागचा राजाचे विसर्जन यंदा होऊ शकलेले नाही. गेल्या पाच तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवरील समुद्रात बसून आहे. यंदा लालबागचा राजाचे विसर्जन करण्यासाठी स्वयंचलित आणि हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला विशेष तराफ तयार करण्यात आला होता.

लालबागचा राजा पाच तासांपासून बाप्पा पाण्यात बसून....

मात्र, लालबागचा राजाची मूर्ती या तराफ्यावर चढत नसल्यामुळे गेल्या साडेतीन तासांपासून हा गणपती समुद्रात चार ते पाच फूट पाण्यात बसून आहे. यामुळे किनाऱ्यावर असलेले गणेशभक्त आणि लालबाग सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दाटले आहे. किनाऱ्यावर असलेले अनेक भक्त लालबागचा राजाची विनवणी करत आहेत. आमच्याकडून काही चुकलं-माकलं असेल तर माफ कर, यापुढे तुझ्या सेवेत हयगय होणार नाही, अशी याचना भक्तांकडून केली जात आहे.

राजाचे विसर्जन रखडले...

लालबागचा राजा काल सकाळी 10 वाजता मंडपातून निघाला होता. तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला होता. त्यानंतर आरती होऊन दीड-दोन तासात गणपतीचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, तोपर्यंत समुद्राला मोठी भरती आली. त्यामुळे लालबागचा राजाचा पाट जड झाला. हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन रखडले आहे. यापूर्वी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा वेगळा होता.

गणपतीला तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू 

मात्र, यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट आहे. समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा हलत आहे. त्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती हायड्रोलिक्सने वर घेण्यात अडचण येत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून लालबागचा राजाला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही लालबागचा राजा तराफ्यावर चढलेला नाही. त्यामुळे गेल्या तीन तासांपासून लालबागचा राजा समुद्रात बसून आहे. समुद्राला भरती असल्यामुळे लालबागचा राजाचा मूर्तीचा अर्धा भाग पाण्यात बुडालेला आहे. अशाच अवस्थेत मूर्ती पाण्यात बसून असल्यामुळे गणेशभक्तांच्या मनात कालवाकालव सुरु आहे. यापूर्वी लालबागचा राजाचा पाट जड होण्याचा प्रकार कधीही घडला नव्हता. आता कोळी बांधव आणि लालबागचा राजाचे कार्यकर्ते गणपतीला तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Lalbaugcha Raja Visarjan 2025 | लालबागचा राजा विसर्जन LIVE

हे ही वाचा -

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजाच्या विसर्जनात विघ्न, गणपती समुद्राजवळ नेला पण.... नेमकं काय घडलं?