मुंबई : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याची चर्चा 2017 साली झाली होती; असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. "आशिष शेलार यांनी 2017 साली हे सांगायचं होतं ना. पाच वर्ष का थांबलात?" असा सवाल अजित पवार यांनी विचारला.


आशिष शेलार काय म्हणाले होते.
2017 सालीच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती असं खळबळजनक वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं. दैनिक लोकसत्तातर्फे आयोजित 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळचा शपथविधी होण्यापूर्वी दोन वर्षे आधीच, 2017 साली राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युतीची चर्चा झाली होती असं आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार म्हणाले की, "भाजपला 2017 सालीच राष्ट्रवादीसोबत युती करावी असं वाटत होतं. शिवसेनेची रोजची धमकी, राजीनामा खिशात घालून फिरत असल्याची वक्तव्यं, यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करावी अशी भूमिका भाजपने घेतली होती. यावेळी 2017 राष्ट्रवादीने आणि भाजपने एकत्रित यावं आणि सत्ता स्थापन करावी अशी चर्चा झाली होती. भाजपच्या नेतृत्वाने नंतर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी असं तीन पक्षांचं सरकार स्थापन करु अशी भूमिका घेतली. पण नंतर राष्ट्रवादीने याला नकार दिला."


Ashish Shelar : भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याची चर्चा 2017 साली झाली होती; आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट


अजित पवार यांचं उत्तर
आशिष शेलार यांनी 2017 साली हे सांगायचं होतं ना. पाच वर्ष का थांबलात? 2022 मध्ये 2017 साली असं झालं होतं ते सांगायचं. 2017 साली बरेच नेते इकडे तिकडे होते.  त्यांची वक्तव्ये तेव्हा वेगळी होती आता वेगळी आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न आधी पाहू. 2017 ला असं झालं, 2012 ला तसं झालं, 2010  तसं झालं यात कोणाला रस नाही. आज काय आहे, महत्त्वाच्या समस्या कोणत्या, मूलभूत प्रश्न काय ते पाहूया, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.


'शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका हा सन्माननीय राज ठाकरेंचा आताचा अजेंडा'
हनुमान चालीसा, भोंगे या मुद्द्यांवरुन मनसेला राष्ट्रवादीची फूस आहे असा आरोप होतोय या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, "राष्ट्रवादीची फूस असती तर पवारसाहेबांना जातीवादी म्हटलं असतं का? साधं गणित आहे ते आपल्या भाषणात भाजपवर टीका करत नाहीत. ते शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करतात. आता सन्माननीय राज ठाकरेंचा अजेंडा तोच दिसतोय. मात्र लोकसभेसा त्यांचा अजेंडा वेगळा होता. भाजपलाच त्यांनी टार्गेट केलं होतं. ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्यच करावी लागेल. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली नव्हती. पण आघाडीच्या उमेदवाराच्या अप्रत्यक्ष प्रचार सभा घेतल्या जात होता. आता ते स्पष्टपणे महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेत आहेत.