मुंबई : ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर आणि पनवेल या ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेत पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामागचं कारण आहे तिथला महिन्याभरात वाढलेला पॉझिटिव्हीटी रेट.


राज्यात सर्वाधिक, 31 टक्के पॉझिटिव्हीटी रेट ठाण्यात आहे, तर मुंबईचा 25 % आणि एकूण राज्यातला पॉझिटिव्हीटी रेट 19% इतका आहे. 27 मे पर्यंत ठाण्यात 20 टक्के  पॉझिटिव्हीटी रेट होता, तर 28 जूनला हा आकडा 31 टक्क्यांवर पोहचला. मागच्या महिन्याभराच्या आकडेवारीनुसार ठाण्यात 11 टक्क्यांनी पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. म्हणजे जवळपास तीनपैकी एक नमुना पॉझिटिव्ह येत असल्याचं या आकड्यांमधून स्पष्ट होतंय.

एकूण केलेल्या कोरोना चाचण्यांमधून पॉझिटिव्ह आढळून येत असल्येल्या लोकांची संख्या म्हणजे पॉझिटिव्हीटी रेट. महापालिका अधिकाऱ्यांकडून सध्या या हेल्थ मॅट्रिकचा वाढत्या कोरोना रुग्ण संख्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण - डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये उद्यापासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन तर पनवेलमध्ये 3 ते 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय तिथल्या महानगरपालिकेने घेतला आहे.

मुंबईत 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू! जमावबंदीसह नाईट कर्फ्यू

पालघर आणि पनवेलमध्ये संख्या जास्त

तसेच मुंबई महानगरातील अन्य दोन क्षेत्र, रायगड आणि पालघर मध्येही कोरोनासाठी पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. पनवेल महानगरपालिकेत समावेश असलेल्या रायगडमध्ये 24 टक्के आहे, जो मागील महिन्यात 15 टक्के  होता. तर वसई - विरार महानगरपालिकेचा समावेश असलेल्या पालघर मध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे 29 टक्के  रेट आहे, जो मागच्या महिन्यात 16 टक्के  होता.

मुंबईचा पॉझिटिव्ह रेट हा मागच्या महिन्यापासून 25 टक्क्यांवर स्थिरावल्याची समानधानकारक बाब समोर आली आहे.

त्यामुळे तुम्हाला जर लॉकडाऊन पुन्हा नको असेल तर सरकारी मार्गदर्शक सुचनांचं पालन करा, अनावश्यक बाहेर फिरणं टाळा आणि तुमच्या शहर किंवा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडून पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्यात प्रशासनाला मदत करा असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.


कुठल्या जिल्ह्यात वाढत आहेत पॉझिटिव्हीटी रेट ?

28 जून / 27 मेची तुलनात्मक आकडेवारी

ठाणे --31 टक्के  / 20 टक्के
पालघर --29टक्के /16टक्के
मुंबई --25टक्के / 25टक्के
रायगड --24टक्के  /15टक्के
औरंगाबाद --22टक्के  /12टक्के
जळगाव --18टक्के /9टक्के
नाशिक --16टक्के  /10टक्के
धुळे --16टक्के  /5टक्के
अकोला --15टक्के  /10टक्के
सोलापूर --15टक्के  /10टक्के

राज्यातील एकूण रेट : 19% /15%



ठाण्यात लॉकडाऊन सुरू

ठाण्यात आज सकाळी सात वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. ठाणेकर देखील लॉकडाऊन पाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाण्यााातील वागळे इस्टेट, आनंद नगर, कोळीवाडा, चिंतामणी चौक या परिसरात तुरळक गर्दी दिसून आली. तसेच भाजीपाला आणि धान्य मार्केट जरी सुरू असले तरी ठाणेकर मात्र याकडे फिरकलेले नाहीत. जांभळी नाका येथील भाजीपाला मार्केट सकाळी 6 ते 11 सुरू ठेवण्याची परवानगी आहे तर धान्य मार्केट सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहील. या दोन्ही बाजारपेठा बंद राहतील असे आधी सांगण्यात आले होते. मात्र आता ते देखील सुरू करण्याची परवानगी दिली गेलीय.


कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊनला सुरुवात
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व चारचाकी आणि दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. गरज असणाऱ्या वाहनांना कल्याण-डोंबिवलीच्या हद्दीत सोडलं जात आहे. कल्याण-डोंबिवलीच्या सर्व एन्ट्री पॉईंट वर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.