मुंबई: भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याचं निमित्त 'संपर्क फॉर समर्थन' अभियान असलं तरी लोकसभा निवडणुकीची तयारी हा त्यांचा प्रमुख अजेंडा असणार आहे.


देशातील बुद्धिजीवी आणि नामवंत व्यक्तींच्या गाठी-भेटीनंतर अमित शहा आज संध्याकाळी राज्याच्या निवडणूक समितीची बैठक घेणार आहेत. या समितीत पक्षातील पहिल्या फळीतील 13 ते 14 सदस्यांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेली तयारी, लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा, उमेदवार छाननी, पालकमंत्र्यांचे दौरे, घटक पक्ष आणि विविध संघटनांची स्थानिक पातळीवरची स्थिती अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल.

याशिवाय एनडीएतील सर्वात मोठा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत येत्या लोकसभा निवडणुकीत युती कायम ठेवण्यासाठी व्यवहार्य प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट असेल.

शिवसेनेसमोर काय असू शकतो भाजपचा प्रस्ताव?

आजपर्यंत लोकसभेला शिवसेना-भाजपचा 21 : 27 असा फॉर्म्युला होता. 2014 मध्ये यापैकी 18 खासदार शिवसेनेचे तर 23 खासदार भाजपचे निवडून आले. भंडारा - गोंदिया पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर भाजपचे 22 खासदार राहिले.

संख्याबळ राखण्याचं आव्हान

केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी असलेल्या जागा राखणं हे भाजप समोरचं सध्याचं मोठं आव्हान आहे.

पालघरच्या पोटनिवडणुकीत लोकसभेसाठी पहिल्यांदाच शिवसेना-भाजप वेगळे लढले. भाजपने जरी पालघर राखलं असलं तरी मतांचं विभाजन होऊन टक्केवारी घसरली. तसेच भंडारा-गोंदियात काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन भाजपचा पराभव केला.

अशा परिस्थितीत जर 2019 मधल्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधकांनी भाजपविरोधात मोट बांधली, तर भाजपसहित शिवसेनेलाही महाराष्ट्रात मोठा फटका बसेल. त्यामुळे लोकसभेसाठी शिवसेनेनं भाजपची युती अभेद्य ठेवण्यातच शहाणपण असल्याचा प्रस्ताव अमित शहांकडून शिवसेनेसमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे.

मात्र लोकसभेत युती करण्यासाठी शिवसेनेचं मन वळवण्यात शाहांना यश येईल का? आणि बदल्यात शिवसेना पदरात काय पाडून घेईल? तसेच लोकसभेच्या वाटाघाटींवर विधानसभेचं भवितव्य ठरेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या शहा - ठाकरे बैठकीत दडली आहेत.

अमित शाहा 'मातोश्री'वर जाणार!

शिवसेनेसोबतचा तणाव टोकाला गेला असताना, आज भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता दोघांची भेट होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय विरोधकांच्या एकजुटीचा सत्ताधारी भाजपने चांगलाचा धसका घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गतच अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

संबंधित बातम्या 

अमित शाह आज 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंची भेट घेणार! 

स्पेशल रिपोर्ट : भाजपवर 'संपर्क फॉर समर्थन'ची वेळ का आली?