मुंबई : गेल्या काही वर्षात एकही वर्ष असं गेलं नाही की पावसाळा आला आणि तरीही मुंबई शहर सुरळीत सुरु राहीलं. दरवर्षी मुंबईत सलग काही तास पाऊस कोसळल्यानंतर सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात होते. दुर्घटना होतात. मात्र, मुंबई बेहाल होण्यामागे नेमकं कारण काय? पावसाळ्यापूर्वी मुंबईतल्या यंत्रणा सज्ज असल्याचा दावा दरवर्षी केला जातो. पण काही तासांच्या पावसातच हा दावा फोल ठरताना दिसतो. गेल्या काही वर्षांपासून दर पावसाळ्यात किमान एकदा तरी मुंबईची अवस्था अशीच होते, असं निरीक्षण आहे. पण हे असं का घडतं?
पावसाळ्यात मुंबईची चिंता वाढवणारे प्रमुख स्पॉट
अंधेरी सब वे
अंधेरी सब वे येथे दरवर्षी मुसळधार पावसात नदी तलावचं स्वरूप प्राप्त होतं. अंधेरी सब वेला पाणी का तुंबत? तर सर्व सबवे हे रेल्वे ट्रॅक खालून रस्त्याच्या उतारावर तयार केले आहेत.अंधेरी सब वे जवळचा नाला जिथे सबवेचं पाणी सोडले जाते तो नाला सुद्धा तुडूंब भरून वाहू लागतो. त्यावेळी सब चेचं पाणी सोडायाचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो.
हिंदमाता
मुसळधार पावसामध्ये नेहमीच हिंदमाता परिसर पाण्याखाली जातो. अनेक वर्ष हिंदमातामध्ये हीच परिस्थिती आहे.
सायन स्टेशन
मुसळधार पावसामध्ये सायन स्टेशन हे सर्वात आधी पाणी सचणाऱ्या स्टेशन पैकी एक आहे. या ठिकाणी पाणी साचलं की मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकलचा खोळंबा होतो. ज्याचा फटका लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसतो.
मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी आजवर काय केलं गेलंय
1) ब्रिमस्टोवॅट प्रकल्प
26 जुलै 2005 च्या पुरानंतर माधवराव चितळे समितीनं केलेल्या शिफारसींनुसार मुंबईत ब्रिमस्टोवॅड म्हणजेच पर्जन्य जलवाहिन्यांचं जाळं तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं. या शिफारशीनुसार शहर आणि उपनगरांमध्ये 58 प्रकल्प हाती घेण्यात आले.
2) पंपिंग स्टेशनची उभारणी
या पर्जन्य जलवाहिन्यांबरोबरच शहरात पंपिंग स्टेशन उभारण्याची शिफारसही चितळे समितीने केली होती. त्यानुसार शहर आणि उपनगरांमध्ये पंपिंग स्टेशन उभारली गेली. या पंपिंग स्टेशनमधल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी समुद्राच्या मुखाशी 27 फ्लड गेट्स बांधण्यात आले आहेत. मात्र, भरती आणि मुसळधार पाऊस या दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या, तर ही फ्लड गेट्स बंद ठेवावी लागतात. हे दरवाजे उघडले, तर भरतीचं पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गेट्स बंदच ठेवली जातात. परिणामी पंपिंग स्टेशनमधून पाणी समुद्रात जात नाही आणि शहर तुंबतं.
3) मिलन सब वेसाठी काय उपाय केले?
भौगोलिकदृष्ट्या सब वे उताराला आहे. त्यामुळे आजूबाजूचे पाणी येथे जमा होऊन विले पार्ले पूर्व-पश्चिम सब वे मार्ग मुसळधार पावसात बंद होतो. मागील काही वर्षांपासून या सबवे जवळ तुंबलेल्या पाण्याचा निचरा कमी वेळेत होतो याचं कारण पंपिंग स्टेशन्स आणि सबवे रस्त्यावर लोखंडी जाळी टाकून केलेली खोली. कारण पावसाचे पाणी या ठिकाणी जमा होऊन जवळच्या नाल्यात सोडलं जाते.
4) हिंदमातासाठी काय उपाययोजना केल्या?
हिंदमाता परिसरात पाणी वाहून नेण्यासाठी ब्रिटानिया उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन) बांधण्यात आले. तरीही निचरा न झाल्यामुळे 2017 मध्ये अभ्यासपूर्ण सूक्ष्म नियोजन करण्यात आले. त्यानंतर हिंदमाता परिसरातील पर्जन्यजल वाहिन्यांच्या सक्षमीकरणाची व पुनर्बांधकामाची कामे हाती घेण्यात आली होती. हिंदमाता परिसराला जोडणाऱ्या 7 किमी लांबीच्या पर्जन्यजल वाहिन्यांचे सक्षमीकरण करण्यात आले. हिंदमाता परिसरातील साचणारे पाणी भूमीगत टाक्यांमध्ये साठवण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पालिकेने यंदा वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून एक समांतर प्रयोग केला होता. परळ उड्डाणपूल आणि हिंदमाता उड्डाणपुलादरम्यान महानगरपालिकेने जोडरस्ता बांधला आहे. या दोन्ही पुलांच्यामधील रस्त्याची उंची वाढवण्यात आली असून त्यामुळे पाणी तुंबले तरी वाहतूक सुरळीत सुरू राहील, अशी ही योजना आहे.
5) मिठी नदी
मिठी नदीची धोकादायक पातळी 4.5 मीटर मानली जाते. मुंबई महापालिका प्रशासन मिठी नदीने 3.2 मीटर पातळी गाठली की आजुबाजूच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात करते. मातोश्री नजीकच्या कलानगर भागात पाणी शिरु नये यासाठी तेथील नाल्यांच्या मुखावर फ्लडगेट बसवण्यात आलेत. परवा रात्री मुसळधार पाऊस झाला तेव्हा मिठी नदीची पातळी 4.2 मीटर्सपर्यंत वाढली होती. सध्या मिठी नदीची पातळी 2.40 मीटर आहे.
सध्या पवई, विहार, तुलसी हे तीनही तलाव ओव्हरफ्लो झालेत. विहार आणि पवई या दोन्ही तलावांची पातळी वाढली की ओव्हरफ्लो झालेले पाणी मिठी नदीला येऊन मिळते. त्यामुळे सतत अतिमुसळधार पाऊस, भरतीची वेळ, आणि पवई-विहार तलाव ओव्हरफ्लो झाले तर मिठी नदीची पातळी वाढते आणि आजुबाजूच्या परिसराला मोठाच धोका निर्माण होतो.