मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यानं पराभूत होत असल्यामुळे आज मनसेच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. यात राज ठाकरे यांना मनसेच्या नेत्यांनी परखड मतं सुनावल्याची माहिती मिळते आहे.



राज ठाकरेंपर्यंत कार्यकर्ता पोहोचत नाही हा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला. शिवाय अनेक विषयात पक्षांकडून तुमच्या भूमिकाच येत नाहीत. असा आक्षेपही सरचिटणीसांनी घेतला आहे. तर तुम्ही माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत आहात असं राज ठाकरेंनी नेत्यांना सुनावलं.

दरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्याह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते.

काहीही झालं तरी मराठीचा मुद्दा सोडायचा नाही. निवडणुकीमध्ये मतं मिळोत अथवा न मिळो, मराठीचा मुद्दा टोकाला न्यायचा. सोबतच पक्ष बांधणीसाठी संघटनेत बदल करायचा, अशी रणनिती मनसेच्या बैठकीत ठरवण्यात आली.



राज ठाकरे लवकरच मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात विभागनिहाय कार्यकर्त्यांना भेटून पुढील वाटचाल ठरवतील. गद्दारांवर कारवाई केली जाणार आहे. मनसेचा पराभव का झाला याची कारणमीमांसा आधीच झाली आहे. ती कारणे लक्षात घेऊनच आजची बैठक झाली आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवत आहोत, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

मराठीच्या मुद्द्यासह मनसे पुन्हा मैदानात!