मुंबई : पश्चिम रेल्वेकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दोन आनंदाच्या बातम्या देण्यात आल्या आहेत. लॉकडाउन झाल्यापासून बंद ठेवण्यात आलेली एसी लोकल आता पुन्हा चालवली जाणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या सुरू असलेल्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे आता दिवसाला 506 ऐवजी 700 लोकल चालवणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारने परवानगी दिलेल्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. 15 ऑक्टोबरपासून या वाढलेल्या फेऱ्या वेळापत्रकात समाविष्ट केल्या जातील.
संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यापासून मुंबई लोकल बंद ठेवण्यात आली होती. त्यासोबत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरू असलेली एसी लोकल देखील तेव्हापासून कारशेडमध्ये प्रतीक्षेत उभी होती. आता मात्र या एसी लोकलला कारशेड मधून बाहेर काढून प्रवाशांसाठी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. 15 ऑक्टोबर पासून पश्चिम रेल्वेवर दररोज एसी लोकलच्या दहा फेऱ्या चालवल्या जातील. या दहा फेऱ्यांपैकी दोन फेऱ्या या धीम्या मार्गावर असतील. त्यापैकी एक महालक्ष्मी ते बोरवली तर दुसरी फेरी बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावर धावेल. उरलेल्या आठ फेऱ्या या चर्चगेट आणि विरार दरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यापैकी चार विरारच्या दिशेने आणि चार फेऱ्या चर्चगेटच्या दिशेने असतील.
यासोबत ज्या नॉन एसी लोकल चालवल्या जात आहेत, त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर 506 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातात. मात्र आता त्यात 194 लोकलच्या फेऱ्यांची वाढ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यामध्ये चर्चगेट आणि विरारच्या दरम्यान 51 फेऱ्या, 96 फेऱ्या बोरिवली आणि चर्चगेटच्या दरम्यान, नऊ फेऱ्या भाईंदर ते विरारच्या दरम्यान, 12 फेऱ्या नालासोपारा आणि चर्चगेटच्या दरम्यान, 9 फेऱ्या चर्चगेट ते भाईंदर दरम्यान, 2 फेऱ्या वसई रोड ते चर्चगेट दरम्यान, 8 फेऱ्या वांद्रे ते बोरिवली तर 8 फेऱ्या चर्चगेट ते वांद्रे दरम्यान चालवण्यात येतील. या सर्व अतिरिक्त लोकल फेऱ्या 15 ऑक्टोबर पासून सेवेत रुजू होतील.
सर्व नवीन बदलांमुळे विशेष लोकलमध्ये होत असणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरकारने परवानगी दिलेल्या खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी या विशेष लोकलच्या फेऱ्या असतील. इतर प्रवाशांना अजूनही लोकलमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही.