Western Railway Block Updates: पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) खाररोड ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम (Sixth Route) सुरू आहे. त्यामुळे 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत 11 दिवसांत 2,525 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून या ब्लॉकचा खऱ्या अर्थानं फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज अप आणि डाऊन मिळून 316 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकात गर्दी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून पश्चिम रेल्वे मार्गावरील 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबपर्यंत या 11 दिवसांत 2,525 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. 27 आणि 28 तारखेला प्रत्येकी 256 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर रविवारी 116 अप आणि 114 डाऊन अशा एकूण 230 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून या ब्लॉकचा खऱ्या अर्थानं फटका बसण्यास सुरुवात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज अप आणि डाऊन मिळून 316 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. रोजच्या सुमारे एक हजार फेऱ्यांपैकी 23 टक्के फेऱ्या रद्द होणार आहेत. शिवाय या काळात संपूर्ण वेळापत्रक बदलणार असल्यानं, सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवास करणं कठीण होऊन बसणार आहे. 


ब्लॉक काळात लोकल फेऱ्याही उशीरानं : रेल्वे प्रशासन


रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचं काम 7 ऑक्टोबरपासून सुरू झालं असून 26 दिवस रूळजोडणीचं काम सुरू राहणार आहे. 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत रूळजोडणीचं मुख्य काम करण्यात येणार आहे. या शेवटच्या दहा दिवसांत रोज सरासरी सुमारे 250 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तसेच, लोकल फेऱ्याही उशीरानं धावणार आहेत. मुंबई लोकलवर कमीत कमी परिणाम होईल, तसं नियोजन रेल्वे अधिकाऱ्यांनी केलं आहे. रूळजोडणीच्या कामासाठी रुळांवरील वाहतूक थांबवणं गरजेचं आहे. मुंबई लोकल सलग काही दिवस बंद ठेवणं शक्य नसल्यानं ब्लॉककाळात काही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. 


रेल्वे प्रशासनाकडून गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान सहाव्या मार्गिकेची जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे मेल-एक्स्प्रेस वाहतूक विनाअडथळा सुरू राहणार आहे. तसेच, नव्या मार्गिकेची सध्याच्या रुळांवर जोडणी देण्याचं काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी केली. तपासणीनंतर लोकल चालवण्यात येणार आहेत. सहाव्या मार्गिकेमुळे वाढीव लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्यांच्या एकूण क्षमतेत 20 टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


4 आणि 5 नोव्हेंबरला जम्बो मेगाब्लॉक


चार आणि पाच तारखेला म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडून 24 तासांचा एक जम्बो मेगाब्लॉक देखील घेण्यात येईल. त्यामुळे पाच तारखेपर्यंत पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेकडून माहिती देण्यात आलीये.   


दरम्यान, ब्लॉकच्या काळात रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रवाश्यांच्या गैरसोयीसाठी रेल्वेकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलीये. दरम्यान मेल एक्सप्रेस प्रमाणे लोकल सेवांवर देखील या ब्लॉकचा परिणाम होणार असल्यामुळे चाकमान्यांना देखील मोठ्या त्रासाला समोरे जावे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.