मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काळपासून पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातील रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागांना रेड अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.


रायगडला रेड अलर्ट


प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात वारे वेगानं वाहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. कोकणात उद्या देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट उद्या देखील कायम ठेवण्यात आला आहे.  पालघर, रत्नागिरी आणि ठाण्यासाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  मुंबईत मात्र पावसाचा जोर आजपेक्षा उद्या कमी राहणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी  करण्यात आला आहे.


पुणे साताऱ्यातील घाट माथ्यावरील ठिकाणांना रेड अलर्ट


पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट परिसरात काही भागात अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.  पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील शहरी भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याची माहिती आहे. विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 



रायगड जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.उद्या पुन्हा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यानंतर पुढचे दोन  दिवस ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्याचा सूचना आता नागरीकांना देण्यात आलेल्या आहेत.भारतीय हवामान विभागानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 25 आणि 26 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 


दरम्यान, पालघर मध्ये पावसानं दमदार हजेरी लावली.पहाटेपासून संततधार सुरू असलेल्या पावसानं काही काळ जोरदार बॅटिंग केली. पालघर, बोईसर, चिंचणी परिसरात मुसळधार पाऊस झाला. पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखलभागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. भिवंडीत देखील पावसानं हजेरी लावली. सखल भागात पाणी साचल्याचं देखील दिसून आलं.


संबंधित बातम्या : 



Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी