मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठी भाषा आणि मुंबई या दोन्हीचं नातं सांगताना याबाबतची अनेक वक्तव्य केली. यावेळी त्यांनी मराठी भाषेचा गौरव करताना 'हा दिवस वर्षातून एकदाच असता कामा नये. रोज या भाषेचा गौरव कसा वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे.' असं ते म्हटले. तसंच दिवसभर मोबाईलवर मेसेज बघताना 'हॅप्पी मराठी डे' असा मेसेज येईल की काय अशी धगधग होत होती, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील दिली. 


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'ज्या राज्यात आपण जातो, राहतो त्याठिकाणच्या भाषेचा आदर केला पाहिजे. मराठी भाषेचा गौरव करत असताना एक अभिमान असला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी भाषा आहे तीच आपली भाषा आहे.' तसंच पुढच्या वेळी मराठी भाषा दिवस भव्य दिव्य स्वरुपात मैदानात झाला पाहिजे, अशी आशाही त्यांनी यावेळी उपस्थित केली. 


'मुंबई ही मिळाली नाही रक्त सांडवून घ्यावी लागली'


मराठी भाषा आणि मुंबईबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'ज्यावेळी मराठी माणसाला न्याय मिळत नव्हता त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या मनगटातील ताकद दाखवून दिली. तसंच सुधीर जोशींनी लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसासाठी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे ही मुंबई अशीच मिळाली नसून रक्त सांडवून घ्यावी लागली. तर या मुंबईतून सर्वकाही मिळत आहे तिथे मराठी पाट्याच हव्या.' तसंच त्यांच्यावर मुलांना इंग्रजी शाळेत शिकवत असल्याची टीका झाली, त्याबाबत बोलताना ते म्हणाले, ''आमच्यावर टिका झाली की हे बघा हे मराठी मराठी करतात आणि यांची मुलं इंग्रजी शाळेत जातात. खरंय आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकली पण बाळासाहेबांनी स्पष्ट केले होते की तुमच्या मुलांना इंग्रजी आली पाहिजे पण घरी मराठीतच बोलायचे.'


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha