मुंबई : एकीकडे राज्याचा शिक्षण विभाग कोविड मुक्त भागात इयत्ता 8 ते 12 वी वर्गाच्या टप्याटप्याने शाळा सुरू करत आहे. तर दुसरीकडे मुलं व्हायरल इन्फेक्शनचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करु शकतात.त्यामुळे आधी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यावर विचार करणे योग्य ठरेल, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हणजेच आयसीएमआरने व्यक्त केलं आहे. आता, राज्यात या आयसीएमआरच्या सल्ल्याकडे कसं पाहिलं जातं? शिक्षण विभाग, पालक आणि टास्क फोर्स सुद्धा याला अनुसरून प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत काय विचार करताय? हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे
केंद्रीय आरोग्य विभागाने नुकताच चौथा सेरो सर्वे केला. त्याचा निष्कर्ष नुकताच जाहीर करताना त्यामध्ये देशभरात लहान मुलांमध्ये 50 टक्के पेक्षा अधिक अँटिबॉडीज असून लहान मुलांना कोविड इन्फेक्शनचा धोका कमी असल्याच आयसीएमआर कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशात पुन्हा सुरवातीला प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय योग्य राहील असं मत आयसीएमआरचे महसंचालक डॉ बलराम भार्गव यांनी मांडलं आहे.
काल जाहीर करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेनुसार
*वय वर्षे 6 ते 9 मधील मुलांच्या शरीरामध्ये 57.2 टक्के अँटिबॉडीजचा प्रमाण आढळलंय
*वय वर्षे 10 ते 17 मधील मुलांच्या शरीरामध्ये 61.2 टक्के अँटिबॉडीजचा प्रमाण आढळलंय
तर
*वय वर्षे 18 ते 44 मधील व्यक्तीच्या शरीरामध्ये 66.7 टक्के अँटिबॉडीजचा प्रमाण आढळलंय
*त्यामुळे जवळपास प्रौढांप्रमाणे अँटीबॉडीजचा प्रमाण लहान मुलांमध्ये आढळत असल्याच आयसीएमआरकडून सांगण्यात आलंय
शिवाय, युरोपियन देशात तर पहिल्या, दुसऱ्या लाटेत सुद्धा प्राथमिक शाळा सुरू ठेवल्याचा दाखला देत प्राथमिक शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचे आयसीएमआरने म्हटलं आहे. शाळा सुरू करताना त्या ठिकाणच्या पॉझिटीव्हीटी रेटचा विचार करणे. सोबतच शिक्षक व इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा लसीकरण पूर्ण असणे हे सुद्धा आवश्यक असल्याचे आयसीएमआर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागाला सुद्धा त्यानुसार नियोजन कराव लागणार आहे. 15 जुलै पासून राज्यातील कोविड मुक्त गावात इयत्ता 8 ते 12 वी च्या सुरू केल्या आहेत. राज्यात एकूण शाळांची संख्या 19997 असून त्यापैकी 5947 शाळा उघडण्यात आल्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची एकूण संख्या 4507445 असून त्यापैकी 416599 विद्यार्थ्यांनी शाळेत आपली हजेरी पहिल्याच दिवशी नोंदवली. शाळा सुरू करण्याबबत घेतलेल्या पालकांच्या सर्वेमध्ये सुद्धा 80 टक्केच्या जवळपास पालकांनी शाळेस पाठविण्यास तयार असल्याच म्हटलं आहे. हा प्रतिसाद पाहता शिक्षण विभागाला पुढची पाऊले उचलणे अपेक्षित आहे.
शिवाय, प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शिक्षक पालकांनी सुद्धा लसीकरण आणि शाळेच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. 'शाळा सुरू करण्याचा आणि त्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करायला गेलो तर शाळेत जात असताना विद्यार्थी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येतात अगदी शिक्षक ते स्कुल बस ड्राइवर या सगळ्याचा प्राधान्याने लसीकरण व्हायला हवं. सोबतच, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना आणि बाहेरील देशातील परिस्थिती पाहता आणखी काही दिवस शाळा सुरू करण्याबाबत विचार करू नये', अस मत मुंबईतील शाळेत शिकवणारे शिक्षक सचिन म्हात्रे यांनी मांडलं आहे. तर 'मध्ये जेव्हा शाळा सुरू करण्याचा विचार राज्यात झाला तेव्हा आम्ही शाळेत पाठवायला तयार झालो, पण नंतर कोरोना पॉझिटीव्ह पेशंट वाढायला सुरवात झाली आणि शाळा बंद कराव्या लागल्या. आता जर शाळा सुरू करत असाल तर लसीकरण सर्वांचे पूर्ण व्हावे. शाळांनी सुरक्षितेची हमी द्यावी, अस मतं औरंगाबादच्या शाळेत आपल्या पाल्याला शिकवणाऱ्या पालक क्रांती बच्छाव यांनी मांडले.
आयसीएमआरकडून पुन्हा एकदा सुरवातीला प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत मत मांडून एकप्रकारे हिरवा कंदील जरी दिला असला तरी आपल्या राज्यात शिक्षण विभागला स्थानिक कोव्हीड परिस्थिती, लसीकरण व इतर सुरक्षिततेच्या बाबींचा काटेकोरपणे विचार करूनच प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा लागेल. त्यानुसार नियोजन शिक्षण विभागाला करावे लागेल व सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील.