सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2016 03:41 PM (IST)
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती, त्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमीर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला. वॉटर कप स्पर्धेचा निकाल जलसंधारणाच्या या स्पर्धेत पहिला क्रमांक साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या वेळू गावानं पटकावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस साताऱ्याच्या जायगाव आणि बीडच्या खापरोटन गावांमध्ये विभागून देण्यात आलं. बीडच्या राडीतांडा आणि अमरावतीच्या वाठोडा, या दोन गावांनी तिसरा क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खानच्या हस्ते विजेत्या गावांना बक्षीस वितरण करण्यात आलं. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. दरम्यान स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचेलेल्या इतर गावांना दिलासा फाऊंडेशनतर्फे प्रत्येकी तीन लाखांचं बक्षीस देण्यात आलं. पाणी फाऊंडेशननं महाराष्ट्रातल्या तीन तालुक्यात ही स्पर्धा घेतली होती. ज्यात 116 गाव सहभागी झाली होती.