मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची आखणी सोमवारी वर्षा बंगल्यावरच करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा कुठे दाखल करायचा? कोणी काय भूमिका घ्यायची याची अंमलबजावणी मंगळवारी सकाळपासून करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


नारायण राणे यांच्या अटकेचं घटनाक्रम..
सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी रात्री साडेसात वाजता महाड इथे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर या विधान बाबत माहिती मुख्यमंत्री यांच्या टीमकडून मुख्यमंत्री यांना देणायत आली. मागील अनेक दिवसांपासून नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुलं मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करत होती. शिवसेना नेत्यांकडून आता नारायण विरुद्ध कार्रवाई करावी असं मत मुख्यमंत्री यांना व्यक्त केलं गेलं. स्वतः मुख्यमंत्री देखील या विधानामुळे भयंकर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.


राणेंना कोकणातच अटक करण्याची आखणी?
यानंतर स्वतः मुख्यमंत्री यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांना कायदेशीर बाबी तपासून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र पोलीसांचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याशी रात्री 11 वाजता फोनवर चर्चा केली आणि गुन्हा दाखल करणायते आदेश दिले. पोलीस महासंचालकांशी बोलण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा केल्याचं ही सांगितलं जाते आहे. रात्री 12 च्या सुमारास गृहमंत्री यांच्या निवासस्थानी या विषयी बैठक झाल्याचंही सांगितलं जात आहे. चर्चेमध्ये असं ठरलं की राणे यांना कोकणातच अटक करायची यासाठी रातोरात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि लगेच अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले गेले. 


तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही, तुम्हा सर्वांना मी पुरुन उरलोय : नारायण राणे


मुख्यमंत्री यांच्याकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलीस महासंचालक यांनी नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि कोंकण पोलीसांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कलम 153 अ, 500, 505 अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगितले. रात्री 1 च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यासाठी युवा सेनेची पदाधिकारी फिर्याद घेऊन पोलिस स्टेशनला दाखल झाले आणि त्यानंतर पुणे, नाशिक आणि महाड इथे गुन्हा दाखल केला गेला. 


रात्री 2-3 च्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करुन गुन्हा दाखल झाल्याची माहिती अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांना देण्यात आली. गुन्हा दाखल केल्यानंतर अटक आदेश काढले गेले आणि नाशिक पोलिसांची टीम पहाटे रवाना केली गेली तर पुणे पोलीस मंगळवारी सकाळी निघाली. पोलीस महासंचालकांनी राणे यांचा जामीन रत्नागिरी कोर्टाने नामंजूर केल्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.